Breaking News

भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश – बिहार रामभरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते दिसली आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये टेस्टींग होत नाहीय. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. प्रेते जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत ही सत्य परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.

उत्तरप्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान-

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे अशी प्रतिक्रिया  त्यांनी व्यक्त केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याचपध्दतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

 ऑक्सिजन कोट्यात कपात करून महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम करु नये 

कर्नाटकातील बेल्लारी येथून देण्यात येणार्‍या ऑक्सिजन कोट्यात कपात करून केंद्राने महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचं काम करु नये असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

राज्यासाठी कोटा निश्चित करण्यात आला असताना आता केंद्राकडून ५० टन कपात करण्यात आली आहे. याचा वापर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये करता येत होता मात्र केंद्राची ही भूमिका अन्यायकारक आहे. ५० टन कपात केली तर कोल्हापूरमधून ११ ते १२ टन गोव्याला द्यायला सांगत आहेत. १२०० टन सरकारचे आणि ३०० टन अतिरिक्त केंद्र सरकार देते. मात्र आता बेल्लारी येथून कपात केली जाणार आहे. केंद्राने ही कपात करून अन्याय करु नये. लोकांच्या औषधोपचाराची जबाबदारी केंद्राची आहे याची जाणीव त्यांनी करुन दिली.

कर्नाटक आणि गोव्यात भाजपचे सरकार असल्याने तिथे जास्त लक्ष देणे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणे योग्य नाही. आमच्या गरजा असताना भाजपशासित राज्यात नेण्याची भूमिका केंद्राची योग्य नाही. त्यामुळेच देशाची एकच नीती असली पाहिजे आणि ऑक्सिजनच्याबाबतीतही तीच नीती राबवावी अशी मागणीही त्यांनी केली.

आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण फक्त स्थानिक लोकांना आधारकार्डवर देण्याची घोषणा केली आहे. मात्र कामानिमित्त त्यांची लोकं देशभर पसरली आहेत. मग इतर राज्यांनी आम्हीही लस देणार नाही अशी भूमिका घेतली तर ही माणुसकी राहिल का? असे सांगतानाच या निर्णयामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या या निर्णयावर आणि लसीबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेणार आहे अशी विचारणाही त्यांनी केली.

Check Also

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *