Breaking News

आम्ही मोदींचे शिष्य, फेसबुक-ट्विटर कसे वापराचे हे त्यांच्याकडूनच शिकलो पवारसाहेबांचा फोटो मॉर्प करणार्‍या भाजपचा फर्जीवाडा समोर आणलाय - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी

चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारसाहेब आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शुक्रवारी भाजपचे नेते नारायण राणे यांनी मार्चपर्यंत भाजपचे सरकार महाराष्ट्रात येणार असे भाकीत केल्यानंतर तात्काळ भाजपच्या आयटी सेलने पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन सोशल मीडियावर शेअर करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तात्काळ आम्ही पवारसाहेबांचा खरा फोटो जनतेसमोर आणला आणि भाजपचा फर्जीवाडा उघड केल्याचे ते म्हणाले.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस भविष्यवाणी करत होते. मात्र ती भविष्यवाणी खरी झाली नाही त्यानंतर चंद्रकांत पाटील स्वप्नातही घोषणा करु लागले. त्यानेही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नारायण राणे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी तर नवसाच्या कोंबड्या व बोकड इतके जमवले की त्यांच्यासाठी राणेंना बोलावं लागतंय अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

जनतेचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आता बरेच आमदार राष्ट्रवादीतून भाजपात गेले त्यांना थोपवून ठेवण्यासाठी भाजपचे नेते पुड्या सोडत आहेत. मात्र सत्य समोर आहे आणि काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन आमदार घरवापसी करणार असल्याचे त्यांनी भाकित केले.

विरोधकांचे चिरहरण जनतेमध्ये करणे ही आमची जबाबदारी 

विरोधकांच्या चारीमुंड्या चीत सोशल मीडियावर होत असल्याने त्यांना भीती वाटतेय. कायदेशीर कारवाई तर होणारच आहे परंतु त्यांचं चिरहरण जनतेमध्ये करणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही करत राहू असा इशाराही त्यांनी दिला.

गृहमंत्री तुमचे असताना तुम्ही सोशल मिडियावर का व्यक्त होता असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सोशल मीडियाचा वापर हा मोदीसाहेबांनी आम्हाला शिकवला आहे. त्यांचे शिष्य आम्ही आहोत. सोशल मिडियातील ट्वीटर, फेसबुक याचा वापर कसा करायचा हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

नवाब मलिक यांच्या घराची व कुटुंबाची हेरगिरी; केंद्रीय गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे रितसर तक्रार दाखल करणार…

केंद्रीय यंत्रणेच्या अधिकार्‍याकडून माझी व माझ्या कुटुंबाची हेरगिरी करण्यात येत आहे याबाबतचे पुरावे माझ्याकडे असून याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे करणार असल्याचे सांगत दुबईमध्ये कार्यक्रमाला गेलो असताना दोन लोकं माझ्या घराची, शाळांची व नातवंडांची माहिती घेत असताना नागरीकांनी हटकले होते. त्यावेळी ते पळून गेले. त्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्या दोन्ही व्यक्तींची माहिती प्राप्त झाली आहे. ‘कू’ हॅंडलवर त्याने माझ्याविषयी याबाबतची माहिती शेअर केल्याचे दिसत आहे. माझी व माझ्या कुटुंबियांची माहिती कुणाला हवी असेल तर मी द्यायला तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या विरोधात काही केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी व्हॉटस्ॲपवर स्वतः मसुदा तयार करुन ईमेलव्दारे खोट्या तक्रारी करायला सांगत आहेत. याबाबतचे केंद्रीय अधिकार्‍याचे व्हॉटस्ॲप चॅटचे पुरावे माझ्या हाती लागले आहेत. राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करणार असेल तर ते सहन करणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधिपत्याखाली काम करणारे अधिकारी याप्रकारे कारवाई करणार असतील तर ते आम्ही बघू पण असे डाव खेळून भीती निर्माण करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करत असेल तर या डावाला घाबरणार नाही असा इशाराही देत एका मंत्र्यांची हेरगिरी करुन खोट्या तक्रारी करण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे रितसर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *