Breaking News

स्टोरीचा आता मध्यंतर झालाय.. रेडकरताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा भाग-नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी
या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला, काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब मलिक यांच्या मध्यांतरनंतर मी बोलणार असे जाहीर केले आहे त्यामुळे सलीम – जावेद सारखं दोघांना मिळून काम करावं लागेल अशी मिश्किल टिप्पणी नवाब मलिक यांनी केली.
मलिक यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रेडकरताई तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणार्‍या लोकांच्या षडयंत्राचा भाग आहात. तुमचा नवरा त्या षडयंत्राचा भाग आहे. जो महाराष्ट्राला बदनाम करत आहे… सरकारला बदनाम करतोय… महाराष्ट्राची अस्मिता कशी संपुष्टात येईल यावर खेळत आहे. महाराष्ट्राच्या नावावर… स्थानिक अस्मितेच्या नावावरची जी चादर ओढण्याचे काम करताय त्यात कोणतीच मदत होणार नाही. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहात. मुख्यमंत्र्यांनी कुणाला भेटावं कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रातील १४ कोटी जनता जर कुठला गुन्हा करत असेल तर आणि बोलत असेल की, आमचा गुन्हा माफ करा कारण आम्ही महाराष्ट्रात राहणारा आहे तर न्यायासमोर जात धर्म पंथ नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्यामुळे ज्या काही गोष्टी समोर येत आहेत. त्यावर त्यांना शिक्षा होईल असेही त्यांनी सांगितले.
माझी शंभर कोटीची औकातच नाही.भाजपने माझा ब्रॅण्ड शंभर कोटीचा केला आहे. सगळं विकलं गेलं तरी माझ्याकडे शंभर कोटी होणार नाहीत. मला भंगारवाला बोलत आहेत त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो… होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे व भंगाराचा व्यवसाय केला. मी वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणात आमदार होईपर्यंत भंगाराचं काम करत होतो. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे असे ठामपणे त्यांनी आरोप करणार्‍या भाजपला सांगितले.
हे प्रकरण इतकं दलदलीत अडकलं आहे की, जितका शोध घेतला असता अजून काही प्रकरणे समोर येत आहेत. माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करा मी जामीन घेऊन पुन्हा माझी लढाई लढेन. परंतु आता मी न्यायालयात जावे असे सांगत आहेत मग वानखेडे न्यायालयात का गेले? माझ्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधू नये. सोशल मिडियावर पोस्ट टाकू नये यावर बंदी घालावी. मात्र हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी यावर तात्काळ सुनावणी घेण्यास हरकत घेतली. निष्पाप लोकांना या देशात बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो काढून घेण्याचा डाव समीर वानखेडे याचा होता. एखाद्याला बोलण्यापासून किंवा लिहिण्यापासूनचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं आहे. कुणालाही बोलण्या-लिहिण्यापासून रोखू शकत नाही. कुणी एखाद्याची बदनामी करत असेल तर त्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्या हत्याराचा वापर व्हायला हवा असेही त्यांनी सांगितले.
काल समीर वानखेडे याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे त्यात त्यांनी मराठी आहोत. मराठी असल्याने सहकार्य करावे असे म्हटले आहे. मग नवाब मलिक यांचे कुटुंब ७० वर्षापासून या शहरात आहे. नवाब मलिकसुध्दा मराठी आहे. या राज्याचा नागरीक आहे मग तो महाराष्ट्राचा नाही, मराठी नाही का? असा सवालही त्यांनी केला.
ज्याप्रकारे एक महिन्याच्या कालावधीत रोज नवनवीन वस्तू समोर येत आहेत. समीर वानखेडेने सर्व प्रकार करुन पाहिले.पहिल्यांदा बोलला की माझ्या कुटुंबाला यात घेतलं जात आहे त्यानंतर विधान केले की आईची बदनामी केली जात आहे. मी कधीही त्याच्या आईचे नाव घेतलं ना कधी बोट दाखवलं. मी जो जन्मदाखला टाकला होता त्यामध्ये दाऊद वानखेडे त्याच्या वडिलांचे नाव आहे एवढंच बोललो होतो. बहिणीबाबत बोलताना प्लेचर पटेलने लेडी डॉन बोलल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. समीर वानखेडेच्या पहिल्या बायकोचा फोटो टाकला त्यावेळी लोकांनी प्रश्न केला हा फोटो का टाकला. मात्र तो फोटो त्यांच्या इच्छेनुसार सार्वजनिक करण्यात आला होता. समीर वानखेडेची आताची बायकोचं कधीही नाव घेतलं नाही किंवा उल्लेखही केला नाही. मला वाटतं ही लढाई कुणाच्या कुटुंबाविरोधात नाही तर कुणाच्या धर्माच्या विरोधात नाही तर कुणाच्या धर्मावर नाही तर माझी लढाई फर्जीवाडा करण्यात आला त्याविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *