Breaking News

धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपाने रामाच्या, विठोबाच्या, खंडोबाच्या जमीनीही सोडल्या नाहीत बीड जिल्ह्यातील आष्टी मधील १० देवस्थानांच्या ५१३ एकर जमीनीत घोटाळा;भाजपच्या आमदारांचा समावेश...

मराठी ई-बातम्या टीम
बीड जिल्ह्यातील एकट्या आष्टी तालुक्यात देवस्थानाची ५१३ एकर जमीन भाजपच्या नेत्यांनी हडप केली असून एकीकडे धर्माच्या नावाखाली राजकारण करणार्‍या भाजपने रामाच्या…विठोबाच्या… खंडोबाच्या… जमीनीही सोडल्या नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन मुस्लिम देवस्थाने आणि सात हिंदू देवस्थानांच्या ५१३ एकर जमिनीच्या कागदपत्रांत फेरफार करुन त्यावर खासगी नाव चढवले. तसेच त्याचे प्लॉटिंग करुन हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला. या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नावाचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते राम खाडे यांनी आष्टी तालुक्यातील दहा देवस्थानांचा जमीन घोटाळा समोर आणला असल्याचे सांगत यात वक्फ बोर्डाच्या चिंचपूर मस्जिद इनाम – ६० एकर, रुई नालकोल – बुहा देवस्थान – १०३ एकर, देवीनिमगाव – मस्जिद इनाम – ५० एकर अशा दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदू देवस्थानामधील मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थानची ४१ एकर ३२ गुंठे, खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान २९ एकर, कोयाळ येथील श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर रामचंद्रदेव देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकत विठोबा देवस्थान ५० एकर अशी हिंदू देवस्थानांची ३०० एकर जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले असून अशी एकूण ५१३ एकर जमीन खालसा केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
२०१७ सालापासून हा उद्योग सुरु असून २०२०पर्यंत देवस्थानाच्या जमिनी हडप केल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व्हावा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी यासाठी एसआयटीची नेमणूक केली. एसआयटीने दोन गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. राम खाडे यांनी गृह, महसूल आणि ईडीकडे या दहा प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. मच्छिंद्र मल्टिस्टेट को.ऑ.सोसायटीचा सहभाग या घोटाळ्यात आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आले. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे या दोन आमदारांचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ईडीच्या माध्यमातून बातमी पेरली होती की वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापेमारी झाली आहे. आम्ही त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत कोणतीही छापेमारी झाली नसल्याचा खुलासा केला होता. महाराष्ट्रामध्ये बोर्डाच्या माध्यमातून ११ एफआयआर दाखल केले आहेत. मंदिर आणि मशीदीच्या जागेवर फेरफार करुन, खासगी नावे चढवून प्लॉटिंग करत ही जमीन विकल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, पुणे, ठाणे आणि बीड जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, बीडमधील नेते राम खाडे आणि महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *