Breaking News

नारायण राणेंची एकाबाजूला मुख्यमंत्र्यांवर टीका तर दुसऱ्याबाजूला आवाहन मी घरातून काम करत नाही आणि डावीकडे उजवीकडे बघून उत्तर देत नाही

मुंबई: प्रतिनिधी

मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी बनवले असून ते दलदलीत बांधले नाही. तसेच, मी घरात बसून काम करत नाही आणि व्यासपीठावर डावीकडे, उजवीकडे पाहून उत्तर देत नसल्याची उपरोधिक टीकेची झोड केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर उठवित गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करत बसण्यापेक्षा बेरोजगार झालेल्यांना पुन्हा रोजगार देण्यासाठी निर्मिती करावं आणि देशाच नाव उज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा सुरू असून शनिवारी ते आज वसई विरार शहराच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. यात्रेदरम्यान त्यांनी वसईतील उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

जेवढी कामे मी केली आहेत, त्यापेक्षा एक दशांश कामे देखील उध्दव ठाकरे यांनी केलेली नसल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुध्दीकरण करून घेतले होते, त्याबद्दल बोलताना म्हणाले की, शुध्दीकरणाचे उद्योग करण्यापेक्षा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करा असे आवाहनही त्यांनी केले.

मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी आणि दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे. मी घरात बसून काम करत नाही किंवा व्यासपीठावर डावी उजीवकडे बघून उत्तरे देत नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याच्या पध्दतीवर टीका केली. तसेच नगरविकास मंत्री हे केवळ सही पुरते असून मातोश्रीच्या संमतीशिवाय एकाही फायलीवर सही होत नाही असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

राज्यात पुरेसा वीज पुरवठा नाही म्हणून ३५० कंपन्या बंद आहेत. या कंपन्या पुन्हा सुरु करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासंदर्भात इथल्या मंत्र्यांशीही बोलणार. ३५० कंपन्या बंद असल्याने ३ लाख कामगार आज बेरोजगार झाले आहेत. गोमूत्र शिंपडणाऱ्यांना हे माहिती नाही. ते शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्या. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे. राज्यातील युवकांना रोजगार द्यावा. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून द्या. देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

शिंदे समर्थक आमदारांच्या त्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रेंडशिप डे… उध्दव ठाकरेंबरोबर मैत्री होणार का? यावर बोलणे टाळले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. …

Leave a Reply

Your email address will not be published.