Breaking News

१४ ऑगस्टचा स्मृतीदिन मोदींना रक्तपाताच्या आठवणीसाठी हवा आहे का ? स्वातंत्र्य व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई- नाना पटोले

नागपूर: प्रतिनिधी

१४ ऑगस्ट हा फाळणी भीषण स्मृतीदिन म्हणून पाळण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय हा भविष्यातील धोक्याची घंटा आहे. १४ ऑगस्ट १९४६ रोजी देशात दोन समुदायामध्ये मोठा रक्तपात झाला होता. नरेंद्र मोदींना आता पुन्हा त्या रक्तपाताची आठवण करुन द्यायची आहे का? देशात पुन्हा रक्तपात करावयाचा आहे का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

प्रदेश काँग्रेसच्यावतीने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानानिमित्त नागपुरातील कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजपा व मोदींचा खरपूस समाचार घेत नाना पटोले पुढे म्हणाले की, १४ ऑगस्टच्या फाळणीच्या वेदनेची आठवण म्हणून स्मृतीदिनाच्या आडून देशातील हिंदू-मुस्लीम वाद उभा करायचा भाजपाचा कुटील हेतू दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तेसाठी भाजपा हे पाप करत आहे का? अशी शंकाही उपस्थित करुन मोदींचा व भाजपाचा डाव ओळखा आणि या शक्तीविरोधात काँग्रेसची शक्ती उभी करा, असे आवाहन केले.

अहिंसा व मनुष्यशक्तीच्या बळावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. परंतु देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, मानवता व त्यागाशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेवर आहे. मोठ्या कष्टाने व बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर संविधान मिळाले ते स्वातंत्र्य व संविधान वाचेल की नाही, टिकेल की नाही याची शंका निर्माण करणारे वातावरण सध्या देशात असल्याचे ते म्हणाले.

इंग्रज सत्तेच्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जात होते, त्यांचा आवाज दडपला जात होता. तीच परिस्थीती आज देशात आहे. केंद्रातील सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपशाहीच्या मार्गाने बंद करण्याचे काम सुरु आहे. दिल्लीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी त्या पीडितेल्या न्याय देण्यासाठी ट्विट केले. देशातील बेरोजगारांचा आवाज बनले, गरिबांना दोनवेळच्या खाण्याचे संकट उभे ठाकले त्या सर्वांचा आवाज बनून राहुल गांधी उभे ठाकले, त्यासंदर्भातील संदेश ट्विटवर केले म्हणून मोदी सरकारच्या दबावाखाली त्यांचे ट्विटर खाते बंद केले. परंतु लोकांच्या दबावामुळे राहुल गांधींचे ट्विटर पुन्हा सुरु करावे लागल्याचा त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना दुग्धसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले की, काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून सर्वसामान्य माणासांच्या अडीअडचणीत त्यांच्या मदतीला जाणे, त्यांचे अश्रू पुसण्याची राहिली आहे. शेतकरी, गोरगरिब, महिला, वंचित लोकांच्या मदतीसाठी काँग्रेस नेहमीच अग्रभागी राहिली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसच्या विचारधारेचे योगदान मोठे आहे, त्याची उजळणी नवीन पिढीला होण्यासाठी व्यर्थ न हो बलिदान हे अभियान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षात त्याग व बलिदानाची परंपरा आहे. गांधी कुटुंबाने देशासाठी इंदिराजी व राजीवजी यांच्या रुपाने बलिदान दिले आहे. पंतप्रधानपद चालून आले असतानाही त्याचा त्याग सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसची ही त्याग, बलिदानाची आठवण आजच्या पीढिला झाली पाहिजे.

या कार्यक्रमाला दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, वरिष्ठ उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी खासदार गेव्ह आवारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस व व्यर्थ न हो बलिदान अभियानाचे समन्वयक अभय छाजेड, विनायक देशमुख, अभिजित सपकाळ, कुंदाताई राऊत, रश्मीताई बर्वे, किशोर गजभिये, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडदे आदी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *