Breaking News
Nana Patole
Nana patole

नाना पटोले म्हणाले, तर भाजपाची नौटंकी… आरक्षणाप्रश्नी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा -

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालयावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आणि नौटंकी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे, असेही ते म्हणाले.

त्यामुळे भाजपाला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. आरक्षण संपवणे हेच भाजपा व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा असा उपरोधिक सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाने मंत्रालयावर आज धडक मोर्चा काढला. या मोर्चाच्या प्रश्नी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

वाचा

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोर्चावेळी भाजपा नेत्यांनी केलेली विधाने ही अत्यंत हास्यास्पद व बालिश होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना ‘मसनात’ पाठवण्याची भाषा केली ही मग्रुरी असून भाजपाचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची सुरुवात झाली तीच मुळी २०१७ साली.

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका फडणवीस सरकारने एक साधे परिपत्रक काढून पुढे ढकलल्या आणि प्रकरण चिघळले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले त्यादरम्यान ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून फडणवीस सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या आणि आता मात्र ओबीसी आरक्षणाचे खापर महाविकास आघाडीवर फोडू पहात आहेत.

वाचा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली तर असे वाद निर्माणच होणार नाहीत. परंतु केंद्रातील भाजपा सरकार त्यावर निर्णय घेत नाही.

ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपाच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्ष त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपाच आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे ही भाजपा सोडता सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपाच असून आता आंदोलन करत ‘मगरीचे अश्रू’ ढाळत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *