Breaking News

विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आता अशा पध्दतीने, नियमात केला बदल हात उंचावून आणि आवाजी मतदानाने -विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात केला बदल

मराठी ई-बातम्या टीम
यापूर्वी विधानसभआ अध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड एकतर सर्वपक्षियांच्या मान्यतेने किंवा त्यावर गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा नियम होता. मात्र आता या नियमात बदल करत विधानसभा अध्यक्षाची निवड ही हात उंचावून आणि आवाजी मतदानाने कऱण्यात येणार असून तसा महाराष्ट्र विधानसभा नियम २२५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला असून चालु अधिवेशनात अध्यक्ष निवड होणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आल्याने त्यांनी आपल्या पदाचा फेब्रुवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला. त्यामुळे मागील आठ महिने हे पद रिक्त होते आणि त्याची जबाबदारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
काँग्रेस सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभा नियम समितीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये नियम समितीच्या अहवालातील सुधारणा करण्याची नोटीस देण्यासंबंधातील दहा दिवसाचा कालावधी २४ तासावर आणण्यात येत असल्याचे सांगितले. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला.
राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी घोडेबाजार टळण्यासाठी आम्ही उघडपणे अध्यक्ष निवडीची पद्धत आणत असल्याचे सांगितले. तसेच माजी पंतप्रधान व भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी वरिष्ठ सदनात सदर पद्धत रुढ केल्याचा दाखला दिला. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या सदस्यांवर विश्वास नाही का, असा सवाल केला.
त्यावर काँग्रेसचे नाना पटोले उठले व भाजप सदस्यांना घोडेबाजार शब्द का डाचतो, असा सवाल केला. आमचा आक्षेप नियम बदलण्यास नाही, मात्र नियम बदलण्याची प्रक्रिया बेकायदेशीर करण्याला आहे, असा मुद्दा फडणवीस यांनी मांडला. तुमच्याकडे १७० चे संख्याबळ आहे, मग का घाबरता असे म्हणत गेली ६० वर्ष जो नियम आहे, तो का बदलता आहात, अशी विचारणाही फडणवीसांनी केली.
शेवटी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सदर प्रस्ताव हा नियम तपासून टाकला असून विरोधकांना काही हरकती असतील तर उद्यापर्यंत मुदत आहे, असे स्पष्ट करत मुद्दा निकाली काढला. शेवटी वैधानिक हक्क वगळत असल्याचे कारण देत भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
या गोष्टीमुळे महाविकास आघाडीने निर्णय
१. सोमवारी विधानसभा अध्यक्ष निवड होईल. सदर पद हे काँग्रेसकडे आहे. मात्र काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
२. संग्राम थोपटे, सुरेश पडपूरकर, के. सी. पाडवी. अमीन पटेल अशी काँग्रेस सदस्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
३. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जरी सत्ताधारी पक्षाचा उमेदवार पराभूत झाला तरी सरकार पडत नाही. मात्र बहुमत नसल्याचे स्पष्ट होते, परिणामी सरकारच्या राजिनाम्याची मागणी होऊ शकते.

Check Also

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, “आभासी उपस्थिती असली तरी पाठिंबा प्रत्यक्षच” निर्भया पथकाच्या धून उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे विरोधकांवर पलटवार

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची दुसऱ्याकडे द्या असा खोचल सल्ला विरोधकांकडून मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *