Breaking News

आरोग्य विभागाची १६००० पदांची नोकरभरती : आठभरात प्रक्रिया पूर्ण होणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेबाबत वर्तविलेल्या अंदाजामुळे रुग्णसेवेसाठी अधिक मनुष्यबळाची गरज आहे. सध्या रुग्णसेवेशी निगडीत ५० टक्के पदभरतीला मान्यता होती. मात्र वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण पाहता १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्याबाबत आग्रहपूर्वक मागणी काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. त्याला मान्यता देतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या स्तरावर पदभरतीचा निर्णय घेण्याला मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

१०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याने आता गट क आणि ड संवर्गाचे १२ हजार पदे भरण्यात येतील. त्यामध्ये नर्स, तंत्रज्ञ, वॉर्ड बॉय, वाहनचालक, शिपाई अशी पदे भरण्यात येतील. तर गट अ आणि ब मध्ये प्रत्येकी २००० पदे अशी एकूण १६ हजार पदे भरण्याची शासनस्तरावरील प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले.

विशेषज्ञ असलेल्या अ संवर्गाची  पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तर वैद्यकीय अधिकारी पदाची ब संवर्गाची पदे आरोग्य विभागाच्या निवड मंडळामार्फत भरली जातील. क आणि ड संवर्गाची पदे भरण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पदे भरल्यानंतर त्याच निश्चित सकारात्मक परिणाम रुग्ण सेवेवर जाणवेल, असे त्यांनी सांगितले.

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *