Breaking News

जयंत पाटील यांची भीती, एकेदिवशी… गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल एवढ्या गोष्टी या गुजरातकडे नेण्यात आल्या

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण ज्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत त्याप्रमाणे एकेदिवशी मुंबईचे महत्त्व कमी होईल आणि गुजरातला आर्थिक राजधानी घोषित केले जाईल की काय अशी भीती जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.

गुजरातला मुंबईविषयी आकस असणे स्वाभाविक आहे. मुंबई गुजरातला मिळाली नाही याचे त्यांना दुःख आहे असा टोला लगावतानाच या मुंबईसाठी १०५ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली. मागील २ वर्षांपासून मुंबईसह बऱ्याच महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका का होत नाही याचा अभ्यास करायला हवा असेही जयंत पाटील म्हणाले.
सरकार हे संपूर्ण राज्याचे असते. या राज्यातील नागरीक, शहर, गाव, तालुका, जिल्हा या सर्वांना शासनाने समान वागणूक द्यायची असते. मात्र इथे जरा वेगळ्या गोष्टी पहायला मिळत आहे. यासाठी जयंत पाटील यांनी MMRDA च्या माध्यमातून मुंबई कोस्टल रोड आणि ईस्टर्न फ्रीवे ला १५०० कोटी, ठाणे आणि बोरिवली ट्वीन बोगदे ३००० कोटी रुपये, ईस्टर्न एक्सप्रेस ट्राफिक सुधारणांसाठी ठाणे – तिन्हात नाक जंक्शनला १०० कोटी रुपये, MTL पुणे ते पुणे एक्सप्रेस वे ला कनेक्ट करण्यासाठी २०० कोटी रुपये, बाळकूम ते गायमुख ठाणे – दहा हजार ५०० कोटी रुपये, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वाहतूक कमी करण्यासाठी आणि विकास कामांसाठी एक हजार कोटी रुपये, JRJ माध्यम प्रकल्पासाठी सहा हजार कोटी रुपये, छेडा नगर -घाटकोपर ते ठाणे फ्रीवे साठी ५०० कोटी रुपये, कल्याण बाय-पास रस्त्याचे काम दीडशे कोटी रुपये, मुंबई ट्रान्स हार्बर १५ हजार ३०० कोटी रुपये घोषित केले आहे.MMRDA ने ६० हजार कोटीचे कर्ज काढले आहे. या घोषणा करत असताना पैसा उभा कसा करणार हे आम्हाला जाणून घ्यायचे होते असेही जयंत पाटील म्हणाले.
metro-3 च्या प्रकल्पाची किंमत ही जवळपास ५० टक्केहून वाढली आहे. एकूण कॉस्ट २३ हजार १३६ कोटी होती ती आता वाढून ३७ हजार २७६ कोटी एवढी झाली आहे. एकावर्षात तब्बल ४ हजार कोटींनी वाढली आहे. या MMRDA आणि MMRCL ने कर्ज घेतले आहे ते foreign bank कडून पण घेतला आहे आणि जर डॉलरचा दर वाढला तर त्याचा परिणाम आपल्या राज्याच्या तिजोरीवर होतो. केंद्रीय वित्तमंत्री यांच्या भाषेत सांगायचे झाले तर रुपया कमजोर होत नाही आहे. डॉलर मजबूत होत आहे आणि त्या मजबुतीचा फटका आपल्याला बसत आहे. सर्व काही सुरू आहे ते काही आलबेल सुरू आहे असे मला वाटत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
सर्व प्रकल्प हे कार्यक्रम करण्यासाठी आहे, इव्हेंट करण्यासाठी आहे अशी शंकाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
महेश आहेर ठाणे पालिकेचा अधिकारी आहे, सिक्कीम युनिव्हर्सिटी येथून बी.कॉम झालेला आहे अशी माहिती त्याने दिलेली आहे. पण माहिती काढली तिथल्या उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींमध्ये हे नाव नाही. ठाणे सहाय्यक आयुक्त कसा होऊ शकतो ? दहावी पास व्यक्ती ठाण्यासारख्या शहराच्या उच्चस्थानी बसत असेल, प्रशासनात बसत असेल तर हे गंभीर आहे. त्यामुळे तो तिथपर्यंत कसा गेला याचा खुलासा व्हायला पाहिजे, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
या महाशयांची बरीच प्रकरणे आहे. याबाबत खोलात जात नाही परंतु ज्याचा हिरानंदानीमध्ये फ्लॅट आहे त्याला प्रकल्पबाधित म्हणून लाभ मिळाला आहे. ही शंका उपस्थित करणारे आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
ठाण्यात काय सुरू आहे ?चुकीचा पायंडा पाडला जात आहे. मला वाटत नाही देवेंद्र फडणवीस यांना हे पटेल ते हळूहळू मुख्यमंत्र्यांपर्यंतही येऊ शकते. त्यामुळे आहेर यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे होते. आज विधिमंडळातील सदस्यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी करावी लागत आहे. देवेंद्र फडणवीस याला आळा घालतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सत्ता कधीच बदलणार नाही अशा अविर्भावात अधिकारी वागत आहेत. त्यामुळे आहेरला निलंबित करा, त्यासंदर्भात समिती स्थापन करा आणि महिन्याच्या आत अहवाल सादर करून दोषी असल्यास कठोर कारवाई करा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *