Breaking News

आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या राज्यमंत्री शंकरराव गडाखांना पदावरून दूर करा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, खंडणीखोरी, वसुली, आणि भ्रष्टाचारा संबंधातील आरोपांच्या सर्व मर्यादा पार करणाऱ्या ठाकरे सरकारच्या तोंडाला काळे फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेल्या प्रतीक काळे नावाच्या युवकाने गडाख यांच्यावर आरोप करणारा व्हिडिओ जाहीर करून आत्महत्या केल्याने ठाकरे सरकारच्या सत्तेच्या मस्तीचा आणखी एक नमुना समोर आला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याकरिता गडाख यांना मंत्रीपदावरून दूर करावे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्रदेश सचिव दिव्या ढोले, नगर जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात प्रतीक काळेच्या आत्महत्येचे प्रकरण उघडकीस आल्यापासून नगर जिल्हा हादरला आहे. केवळ २७ वर्षांच्या या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह अनेकांची नावे घेऊन प्रतीक काळे याने मृत्यूपूर्वी तयार केलेला व्हिडिओ ही त्यांची मृत्यूपूर्व जबानी असल्याने त्या दिशेने तपास होणे गरजेचे असून शंकरराव गडाख ह सत्तेवर असल्याने तपासावर दबाव येऊ शकतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
याआधीही ठाकरे मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या एका मंत्र्यास एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारमधील मंत्र्यांची नावे येणे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने लाजीरवाणा प्रकार असून सत्तेच्या मस्तीपुढे मंत्र्यांनी नैतिकता गुंडाळून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मंत्र्यांना पाठीशी घातले जात असल्याने अत्याचारात सहभागी असलेल्यांना सरकारचा आशीर्वाद असल्याची जनतेची भावना झाली आहे. बलात्कार प्रकरणी पीडितेने आरोप केल्यानंतरही सत्तारूढ पक्षाचा एक पदाधिकारी सरकारी पाठबळाच्या जोरावर उजळ माथ्याने फिरत असताना गडाख यांच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होत असल्याने सरकारच्या नैतिकतेचे वाभाडे निघाले असल्याची टीका त्यांनी केली.
प्रतीक काळे हा शंकरराव गडाख यांचा स्वीय सहाय्यक होता. आत्महत्येपूर्वी त्याने तयार केलेल्या ऑडिओ-व्हिडिओ क्लीपमध्ये त्याने शंकरराव गडाख, त्यांची पत्नी, तसेच भावाच्या नावाचाही उल्लेख केला असून गडाख कुटुंबाकडून आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली. आपल्याला होणारा त्रास असह्य होत असल्याचे नमूद करून त्याने आत्महत्या केल्याने, गडाख कुटुंबीयांची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, अशी प्रकरणे पाठीशी घालण्याची ठाकरे सरकारची परंपरा पाहता, चौकशी दरम्यान शंकरराव गडाख मंत्रीपदावर राहिल्यास तपासावर दबाव येऊन प्रकरण दडपले जाण्याची शक्यता असल्याने गडाख यांना पदावरून दूर केले नाही, तर जिल्ह्यात उग्र असंतोष उफाळेल व त्याची जबाबदारी ठाकरे सरकारवर राहील असा इशाराही त्यांनी दिला.
ठाकरे सरकारमधील मंत्र्यावर झाला नाही असा एकही आरोप आता शिल्लक राहिलेला नसून केवळ सत्ता टिकविण्यासाठी भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळविली आहे, असा आरोप करत प्रतीक काळे आत्महत्या प्रकरणी स्थानिक माध्यमांनी जोरदार आवाज उठवूनही तो कानावर पडत नसलेले ठाकरे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत किती असंवेदनशील झाल्याचा आरोप त्यांनी केला.
आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ येथे अनावरण
केदारनाथ येथे ५ नोव्हेंबर रोजी श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे व मूर्तीचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला तसेच १२ ज्योतिर्लिंग अशा देशभरातील ८२ तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत. राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर , भीमाशंकर , परळी वैजनाथ , औंढा नागनाथ तसेच पंढरपूर , माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ही उपाध्ये यांनी दिली.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *