Breaking News

वसंत मोरे म्हणाले, मला डावलण्याचा आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न मनसे मेळाव्याच्या पत्रिकेत नावही नसल्यावरून व्यक्त केली नाराजी

गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या मनसे मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत मस्जिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. मात्र पुणे मनसेचे शहराध्यक्ष असताना वसंत मोरे यांनी राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाच्या नेमकी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मोरेंना बोलावून चर्चा केली. तसेच मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवित साईनाथ बाबर यांच्याकडे सुत्रे सोपविली.

त्यानंतर आपल्याला डावलण्याचे आणि बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरु असून काही जणांना मी पक्षात नकोय म्हणून मनसेच्या मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत देखील नाव नसल्याचे मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे खंत आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा मेळावा आणि नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले आहे. मात्र हा मेळावा सुरू झाल्यानंतर वसंत मोरेंची अनुपस्थिती दिसून आल्याने विविध चर्चां रंगू लागल्या होत्या. अखेर मेळावा सुरू झाल्याच्या जवळपास अर्धा तासानंतर वसंत मोरे कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी प्रश्नांना उत्तर देताना आपली नाराजी देखील व्यक्त केली आणि मला डावललं जात असल्याचा आरोपही केला.

मी येणार नव्हतो असं काहीच नाही, मी असं काही बोललोच नव्हतो. मात्र मेळाव्याची जी पत्रिका आहे, त्यात कोअर कमिटीच्या दहा जणांचीच नावे होती आणि मी अकरावा आहे माझं त्यात नाव कुठल्याच कार्यक्रमात नव्हतं. मी रात्री देखील सांगितलं होतं की मला मेळाव्याला यायचं आहे, रात्री उशीरा माझ्याकडे ती कार्यक्रम पत्रिका आली. त्यामध्ये वेळापत्रकात माझं नाव नव्हतं. त्यानंतर आता मला शहराध्यक्षांचा फोन आला होता असे त्यांनी सांगितले.
तुम्हाला डावललं जात आहे का? होय, तसं वारंवार घडतय. मी याबाबत अनिल शिदोरे यांना कळवले आहे. या सगळ्या गोष्टी मला जिथे सांगायच्या तिथे सांगितल्या आहेत.

आगामी निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसेल असं वाटत नाही का? यावर त्यांनी शक्यता आहे, असं सांगितले.

तर, आपली पुढची भूमिका काय असणार आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, माझी भूमिका सुरुवातीपासूनच पक्षासोबत आहे. मी कुठे पक्षाच्या बाहेर पडलोय? फक्त मला डावलण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय. काही जणांना मी पक्षामध्ये नकोय. मला डावलून राज ठाकरे यांच्यासमोर वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वसंत मोरे यांच्या कानात काहीतरी बोलल्याचं दिसून आले होते. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, रोहीत पवार यांनी तात्या तुम्ही अतिशय चांगली भूमिका घेतली. तुम्ही मनसेत राहिलात, त्यांनी मला ऑफर दिलेली नाही, उलट त्यांनी सांगितल की तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेतली ते बरोबर केलं. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी माझी भूमिकाच बदलली नव्हती, मी अगोदरपासूनच सांगितलं होतं की मनसेत आहे आणि मनसेतच राहील असे सांगितल्याचेही मोरे यांनी सांगितले.

Check Also

तुरुंगातून अरविंद केजरीवाल देत असलेल्या संदेशाची ईडी घेणार गंभीर दखल

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीने अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *