Breaking News

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, पहिल्यांदा घरच्यांना सांग… शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र

ईडीची नोटीस आम्हालाही आली मग आम्हीही गेलोच ना, मग यांना मिळाली. त्यावर विधानसभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठणकावून सांगत होते माझ्या घरच्यांना हात लावाल तर खबरदार मला सर्वात आधी अटक करा, पहिल्यांदा घरच्यांना सांग मुंबई महापालिकेत जावू नको म्हणून असा थेट निशाणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर साधत बाळासाहेबांचा फोटो लावायचा आणि मुंबई सगळी बिल्डरांच्या घशात घालायची, बेस्ट डेपोच्या जागा देताना एखादी चांगली जागा नाही मिळाली का बाळासाहेबांच्या स्मारकांसाठी की मला बंगाल आवडला म्हणून तो घ्यायचा आणि त्याला नाव द्यायचे बाळासाहेबांचे स्मारक असे सांगत महापौर बंगला ढापला अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली.

मनसेच्या वर्धादिना निमित्त आयोजित मनसे मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरही टीकेची झोड उठविली.

त्या महापौर बंगल्याच्या बाहेर रोज संध्याकाळी बगा सगळ्या परदेशी गाड्या असतात. संध्याकाळी सगळे तिथेच असतात नाव बाळासाहेबांचे आणि त्या बंगल्यात व्यवहार यांचे असा गंभीर आरोप त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर केला.

निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे प्रचाराला आले, अमित शाह येथे आले त्यांची भाषणे झाली. त्या भाषणात ते म्हणाले देवेंद्र फडणवीस भाजपाचा मुख्यमंत्री होणार म्हणून पण तुम्ही काही बोलला नाहीत. बरं आम्हालाही नाही सांगितले. निवडणूकीआधी लोकांनी तुम्हाला भाजपा-शिवसेना युती म्हणून मतं दिली आणि निकालानंतर वेगळाच साक्षात्कार यांना झाला. म्हणे अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद ठरले होते. बर कोणाशी बोललात तर अमित शाह यांच्याशी चार भिंतीत बोललो होतो. तर अमित शाह म्हणतात अशी कोणती गोष्ट झाली नव्हती. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा होणार आहे. तर लोकांना हे कळायला नको होते का? मग बंद दाराआड का बोललात असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मी पंतप्रधान मोदींना सांगितले होते तुम्ही फक्त बिहार उत्तर प्रदेशसह तिकडच्या तीन राज्यांवर लक्ष द्या बाकीचे सगळं आपोआप होईल. सुदैवाने उत्तर प्रदेशात विकासाची कामे सुरु असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. ही चांगली गोष्ट आहे. परवा निवडणूकीत काही जण उत्तर प्रदेशात गेले होते. तेथील एका हॉटेलवर चहा प्यायला थांबले. तर त्या हॉटेलचा मालक यांच्याकडे आला आणि त्याने जात विचारली आणि मग त्याने त्याेच्या नोकरांना चहा द्यायला सांगितला. हे असलं महाराष्ट्रात सुरु करायचं का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

बरं हे ज्यांच्या सोबत गेले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी भलत्याच बरोबर दिसले. कोण कोणासोबत पळून गेले आणि कोणाशी लग्न केले असे सांगत पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले. मग नंतर आदेश आले हे लग्न होणार नाही म्हणून. त्यानंतर हे आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वाढले. हा तमक्या जातीचा आणि हा अमक्या जातीचा. महाराष्ट्रात जाती पाती असणे शरद पवार यांना हवं आहे. त्यामुळेच हे सगळं सुरु आहे. हिंदू हा फक्त हिंदू-मुस्लिम दंगलीच्या वेळी असतो. चीनने हल्ला केला की तो गोंधळतो मी नेमका कोण? पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हिंदू हा भारतीय होतो. मग काहीच नसले की तो मराठी, तामीळ, गुजराती असा होता. मग जेव्हा तो मराठी होतो तेव्हा तो ब्राम्हण, मराठा, माळी, दलित असा विभागला जातो. मग हिंदू होणार कधी असा सवाल करत तुम्हाला विसरायची सवय लागली असल्याने तुम्हाला कोण विचारत नाही. आणि तुम्हीही मतदान त्यांनाच करता अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोणी तरी पोलिस अधिकारी तुरुंगात जातो. त्यानंतर पोलिस आयुक्ताला काढून टाकलं जाते. आणि तो आयुक्त आरोप करतो गृहमंत्र्यांनी १०० कोटी मागितले म्हणून. गृहमंत्रीही तुरुंगात जातो. त्यानंतर दाऊद इब्राहीम याच्याशी संबध असल्याच्या कारणावरून दुसरा एक मंत्री तुरुंगात जातो तरीही सरकार सुरुच. या सरकारला काहीही फरक पडत नाही. ते तुम्हाला मतदार म्हणून ग्रहीतच धरत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर

सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published.