Breaking News

वडेट्टीवारांचे “अनलॉक” तर सीएमओचे “प्रस्ताव विचाराधीन” राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन-मुख्यमंत्री कार्यालय

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजी पासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर १ जूनपासून पॉझिटीव्हीटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने मान्यता देत निर्बंध कडक ठेवण्याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्याच दोनच दिवसांचा कालावधी लोटला नाही तोच आज मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १२ वीची परिक्षा रद्द करत राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यावर तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडून नव्या नियमांचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असल्याचे सांगत मंत्री वडेट्टीवार यांच्या घोषणेच्या अगदी उलट भूमिका मांडली. त्यामुळे अनलॉकची घोषणा करणाऱ्या वडेट्टीवारांनाच पुन्हा अनलॉकचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगण्याची नामुष्की  आली.

मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकानानुसार, कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनचनिर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल असे स्पष्ट केले.

मंत्री वडेट्टीवार यांच्या घोषणेमुंळे राज्यातील कोरोना एकदम संपुष्टात आला की काय असा एकप्रकारचा संदेश जनतेमध्ये गेला. याशिवाय निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे त्यांनी सांगितल्याने आता सगळे पूर्वीप्रमाणे होणार असल्याच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील निर्बंध अद्याप लागू असल्याचे सांगत तशा पध्दतीचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून यासंदर्भात पूर्ण माहिती हाती आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याबाबतची माहिती शासन निर्णयाद्वारे देणार असल्याचे देणार असल्याचे सांगितले.

अखेर मुंबईहून नागपूरला मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पोहोचल्यानंतर यासंदर्भात पत्रकारांनी विमानतळावरच त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, राज्यात अनलॉकचा निर्णय झालेला नाही. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून त्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तत्वत मंजूरी दिली आहे. तसेच राज्यातील निर्बंध उठविण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतील असे सांगत अनलॉक घोषणेपासून यु टर्न घेतला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *