Breaking News

पंतप्रधान मोदींशी बोला नाहीतर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू राज्यमंत्री बच्चू कडूंचा आघाडी सरकारला इशारा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनला पाठिंबा दिलेले आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून अनुदानाची व्यवस्था करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू असा इशारा आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.

सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीचा बराच धुरळा उडताना दिसत आहे. अशात आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये या करीता महाविकास आघाडी कडून हॉटेल मॅनेजमेंट सुरू आहे. इतरही काही अपक्ष आमदारांशी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून चर्चा सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीत सत्तेत सहभागी असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.

धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था केंद्र आणि राज्य सरकारनं करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. सध्या धान आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. केंद्र सरकारने जे खरेदीचे लक्षांक दिले, ते कमी आहेत. संपूर्ण राज्यात एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. पण आता केंद्र सरकारनं खरेदीसाठी हात वर केलेत.

धान उत्पादक शेतकरी देखील ४ ते ५ लाख असून केंद्र सरकार धान खरेदी बंद करत आहे. केंद्रानं खरेदी सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पाहिजे. खरेदी होत नसेल तर, किमान चार हजार रुपये प्रति एकर मदत हरभरा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असं झालं नाहीतर आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू, असा इशारा देतानाच मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, असे बच्चू कडू म्हणाले.

आमचे मतदान भाजपाला जाणार नाही, मात्र आघाडीला देखील शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात तब्बल १८ वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आलं. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणारच आहे. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ५५, काँग्रेस ४४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार (अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता), त्याशिवाय पाठिंबा देणारे काही आमदार. या सर्वांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *