Breaking News

मंत्री भुजबळ म्हणाले, जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे तोपर्यंत… राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राज्य सरकार संपुर्ण राज्यात विविध कार्यक्रम राबवणार

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते..

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे सर्व घटकांना पुढे घेऊन जाणारे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात राज्याने सर्व घटकांना समान न्याय दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिम्मीताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणुन आपण साजरे करणार आहोत त्यानिम्मीताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी देखील आवश्यक निधी आपले महाविकास आघाडी सरकार उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील, शहराध्यक्ष आर. के पोवार, माजी आमदार के.पी पाटील, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब चोपडे, अनिल साळोखे, व्ही.बी पाटील, सुनिल देसाई, भैया माने, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष जाहिदा मुजावर, समता परिषद शहराध्यक्ष शीतल तिवडे, तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विरोधकांवर टीका करताना मंत्री भुजबळ म्हणाले की, या देशाचे केंद्र सरकार, ईडी, सीबीआय यांचे सरकार आहे. या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. मात्र राज्य सरकार विकास कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने सर्वांसाठीच भरीव तरतुद केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाने भरीव तरतूद प्रस्तावित केली.

या जिल्हयात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ हे यांचे काम अतिशय जोरदार सुरू आहे. सातत्याने कोल्हापूरचे विविध प्रश्न ते मंत्रिमंडळात मांडत असतात. कामगार विभाग असेल किंवा ग्रामविकास विभाग असेल या विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना आखण्यात त्यांचा कल असतो त्यामुळेच कोविड महामारीच्या काळात सरकारने बांधकाम कामगार, माथाडी कामगार, घरेलु कामगार, सुरक्षा रक्षक अशा एकुण १३ लाख ०३ हजार कामगारांना ७१५ कोटी रुपयांचे अर्थसह्हाय दिले आहे. या व्यतिरीक्त ऑटो सायकल रिक्षा चालक, छोटे व्यापारी, फेरीवाले आदी अनेक गरजू घटकांना आर्थिक तसेच अन्नधान्यांची मदत केली आहे. नियमित पीक कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाची घोषणा आम्ही केली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलेल्या वचनाची पूर्ती आम्ही केली आहे आणि इथुन पुढच्या काळात देखील करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर विकास आराखडयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाकरीता २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाला “यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला” “राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल” तसेच अन्य विभागांच्या आधुनिकीकरणाकरिता १० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोल्हापूर विमानतळाकरीता आवश्यक जमिनीचे भूसंपादन व न‍िर्वनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *