बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे कारवाईसाठी पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना धमकविण्यात आल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय देशमुख हे पोलिस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना धमकाविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मी कुणाचेही नाव घेत नाही. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मस्ती किंवा माज आम्हाला नाही. पण जर आमची मुलं रस्त्यावर येणार असतील तर आमच्यापुढे पर्याय नाही. तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर हे सहन करायचे असा सवाल करत सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात याचा अर्थ तुमचे सगळे आरोपी मंत्री सांभाळत होते. या हत्येतील आरोपी आणि खंडणीतील आरोपींची नार्को टेस्ट करायला पाहिजे अशी मागणीही यावेळी केली पाहिजे अशी मागणी ही यावेळी केली.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागायला आलो तर आम्ही जातीयवादी होतो, मग तुम्ही आरोपी सांभाळता मग तुम्ही कोण असा उपरोधिक सवाल करत संतोष देशमुख यांची निर्घुघ्नपणे हत्या केली जाते तो जातीयवाद नव्हता का असा सवाल करत सरकार आणि बाकीच्यांना काय म्हणायचे असेल ते म्हणू द्या पण समाज म्हणून आपणाला लढावे लागेल अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट केली.
तसेच शेवटी बोलताना मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देणार आणि सर्वांना अटक करणार असा शब्द दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांच्या शब्दामुळे मराठे शांत आहेत अन्यथा मराठे अशा गोष्टीबाबत कधी शांत नसतात असेही यावेळी सांगितले.