Breaking News

मंगलप्रभात लोढांचा खुलासा, मी तर तुलना केली…

शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य समोर आले. विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून लोढांवर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वबूमीवर मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, विरोधकांना बोलायचा अधिकार आहे. पण जे झालं नाही आणि जे टीव्ही किंवा सोशल मीडियावर सुरू आहे, जे राष्ट्रवादीचे नेते बोलत आहेत, त्यांनी मी नेमकं काय बोललो हे त्यांनी बघितलं असेल का? त्यांनी बघितलेलं नाही. मी फक्त उदाहरण दिलं होतं, कधीही तुलना केली नाही करू शकत नाही. कोणीच करू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत. मग त्यांची तुलना करण्याचा मूर्खपणा कोणी कसा काय करेल आणि मी तर तो कधीच करणार नाही.

मी कधीच वैयक्तिक टिपण्णी करत नाही, मी कधीच राजकारणातही पडत नाही. सरकारचं काम सकारात्मकतेने करायचं आहे, हेच माझ्या डोक्यात असतं. महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. माझ्याकडे जे काही दोन-तीन विभाग आहेत, त्यामध्ये मी आणखी काय करू शकतो, त्याच्या प्रयत्नात मी असतो. राजकारणात आजपर्यंत गेलो नाही आणि नंतरही जाणार नाही. हे जे काही झालं ते आता बंद केलं पाहिजे.
आरोप करणे हा लोकशाहीत विरोधी पक्षाचा व सर्वांचाच अधिकार आहे आणि आम्ही त्याचं उत्तरही दिलं पाहिजे, यासाठीच मी तुमच्या समोर आलो आहे. मी तुलना केली नाही, मी उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण प्रत्येक मुलाला दिलं जातं. त्याच्या जन्मापासून त्याला शिकवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? मग तेव्हा काय त्यांची तुलना केली जाते का? याविषयी ज्याप्रकारे राजकारण केलं जातय ते राजकारण व्हायला नको. छत्रपती शिवाजी महाराज तळपता सूर्य होते, त्यांची त्याच स्थानवर पूजा केली पाहिजे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना वादात आणणं बंद झालं पाहिजे, असंही यावेळी लोढा म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली. शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी, असे विधान लोढा यांनी केले.

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *