Breaking News

न्यायालयाच्या सवालानंतरच पंतप्रधान मोदी ‘देर आये दुरुस्त आये’ केंद्राने उशिरा जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवाब मलिक यांनी लगावला टोला

मुंबई: प्रतिनिधी

आज केंद्राने सर्व जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोला लगावत उशिरा का होईना केंद्राला निर्णय घ्यावा लागलाय. आता राज्यांना व लोकांना लस पुरवठा मागणीनुसार होईल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेशी संबोधन करण्यासाठी टिव्हीवर येत होते. मात्र आज वेळेअगोदरच लोकांशी संवाद साधण्यासाठी टिव्हीवर आले. १८ ते ४४ वयोगटातील लोकांची जबाबदारी ही केंद्र सरकारने राज्य सरकारांवर ढकलली होती. मात्र आज केंद्र सरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. यामागेसुध्दा तीन कारणे असल्याचे संशय त्यांनी व्यक्त केला.

लसीकरणासाठी ३५ हजार कोटीची तरतूद संसदेत करण्यात आली होती. तशी मान्यताही घेण्यात आली. शिवाय जी २५ टक्के लस उपलब्ध होती, त्याची पूर्तताही केंद्राकडून होत नव्हती. राज्यांना ३०० ते ४०० रुपये दराने लस खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र राज्यातील जनतेला लसपुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत होते. विशेष करून सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्राचे लसीबाबतचे दर वेगवेगळे का? ३५ हजार कोटीची तरतूद करुनही पैसे का खर्च करत नाहीय असा सवाल केंद्र सरकारला करत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. केंद्रसरकारच्या प्रतिमेवर व निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केल्याचे सत्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार भूमिका व निर्णय बदलत असल्याने त्यावर सातत्याने आम्ही बोट ठेवत योग्य नसल्याचे निदर्शनास आणून देत होतो. आता सुरुवातीपासून असलेली जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली आहे .आता अपेक्षा आहे हे सर्व वेळेत मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या 

‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा असे सांगत ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्र सरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे. ट्वीटरवरील ‘ब्लू टीक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ

जिथे भाजप तिथे मृतांचे आकडे लपवण्याचा खेळ सुरू आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

राज्यात कोरोनाने एक लाखापर्यंत मृतांचा आकडा पोचला असून भाजप महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याचे बोलत आहे. पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद केंद्र सरकारच्या नियमानुसार पारदर्शकपणे करण्यात आली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य एकमेव आहे जिथे मृतांच्या आकड्यांची नोंद पारदर्शकपणे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही कुठलेही आकडे लपवलेले नाही. जी परिस्थिती आहे ती जनतेसमोर ठेवली आहे. ७० हजार दरदिवशी केसेस येत असताना राज्यात हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा ऑक्सिजन मिळाला नाही अशा बातम्या आल्या नाहीत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाराष्ट्र व मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झाले आहे. ४ लाख लोकांच्या मृत्यूचा आकडा देशात दिसत आहे. परंतु पत्रकार आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून हा आकडा दहापट म्हणजे ४० लाखाच्या घरात जात आहे ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

एकट्या उत्तरप्रदेशमध्ये ५ ते ६ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींचे मृतदेह अक्षरशः नदीत प्रवाहीत करण्यात आले, तर काही ठिकाणी नदी किनारी भगव्या वस्त्राच्या कफनात लपटलेले मृतदेह पडलेले पहायला मिळाले. गुजरातमध्ये आणि बिहारमध्येही मृतांचे आकडे लपवण्यात आल्याचे समोर आले आहे. भाजपला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु आम्ही महाराष्ट्रात भाजपसारखे मृतांचे आकडे लपवले नाहीत असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *