Breaking News

मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बांधले हाती घड्याळ

मराठी ई-बातम्या टीम  

मालेगाव महानगरपालिकेतील कॉंग्रेसच्या महापौरांसह २८ नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निश्चित झाला आहे अशी भावनाही व्यक्त केली. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच जयंत पाटील यांनी केले.

ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्ये विकास साधला आहे, त्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शेख रशीद शेख शफी १९९९ साली विधानसभेत आमदार म्हणून आले होते. मालेगावमधील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. मालेगावचे प्रश्न तळमळीने मांडताना आम्ही त्यांना पाहिले आहे. शेख रशीद यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांच्यासोबत मनपातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत. शरद पवारांनी देखील कधीही जातीपातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालवला. अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे, त्यामुळे या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगाव येते काय सुविधा उभारता येतील. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मालेगावमधील कब्रस्तानशी निगडीत प्रश्न लवकर सोडवू असे आश्वासन दिले. तसेच कौशल्य विकास खात्यामार्फत मालेगाव येथे नवीन पॉलिटेकनिकल महाविद्यालय लवकरच उभारू अशी ग्वाही दिली.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पवारांच्या विचारधारेवर विश्वास असल्यामुळे मालेगावमधील नगरसेवक आसिफ शेख, शेख रशीद यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. नांदगावमध्ये मागच्यावर्षी पूर आल्यानंतर सगळीकडे चिखल जमा झाला होता, घराघरात पाणी शिरले होते. त्यावेळी मालेगाव मनपाच्या विविध विभागाने नांदगावमध्ये मोठ्या प्रमाणावर बचावकार्य केले. पुढच्या मनपा आणि विधानसभेत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल असे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार रशीद शेख, मालेगाव महापौर ताहेरा शेख रशीद, नगरसेवक माजी मनपा सभागृह नेता अन्सारी मोहम्मद अस्लम खलील अहमद, माजी स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, विठ्ठल भिका बर्वे, सलीम अन्वर, नजिर अहमद इरशाद अहमद, मोहम्मद कमरुन्नीसा रिजवान, नंदकुमार वाल्मिकी सावंत, मंगलाबाई धर्मा भामरे, फकीर मोहम्मद शेख सादीक, जैबून्नीसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, हमीदाबी शेख जब्बार, रजिया बेगम अब्दुल मजीद, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, शेख रजियाबी इस्माईल, निहाल अहमद मोहम्मद सुलेमान, फारुख खान फैजूला खान, नुरजहॉ मोहम्मद मुस्तफा, सलीमा बी सैय्यद सलीम, किशवरी अशरफ कुरेशी, नईम पटेल शेख इब्राहिम पटेल, मोहम्मद सुलतान मोहम्मद हारुण, हमीदाबी साहेबअली, रिहानाबानो ताजुद्दीन, फैमीदा मोहम्मद फारुख कुरेशी, अनिस अहमद मो. अयुब शाह फकीर आदी २८ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती इरफान अली आबीद अली, माजी नगरसेवक मोहम्मद इस्माईल (मुल्ला), माजी नगरसेवक शेख गौस शेख मुनीर, एमआयएम चे नगरसेवक अब्दुल अजीज शेख रफीक (बेकरीवाला), भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय (भारत) संजय आहीरे, मुशरीफ खान रंगारी, शेख इमरान आदींनीही जाहीर प्रवेश केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *