Breaking News

महायुती सरकारचा आझाद मैदानावर शपथविधीः मुख्यमंत्री दोन दिवसात ५ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या बहुमतावर सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकिय पक्षांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी का पुढाकार घेत नाही असा सवाल करत संशयातीत बहुमतामुळेच भाजपाकडून सत्तास्थापनेत उशीर करत असल्याची चर्चाही राज्यात रंगत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपाने सत्ता स्थापनेचा आणि शपथविधीचा कार्यक्रम आज जाहिर केला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ आणि ट्विटरवर पोस्ट करत महायुती सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती दिली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच हा कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता सीएसएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडणार असल्याचेही यावेळी सांगितले.

तसेच पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पुढील दोन दिवसात केंद्रातील दोन निरिक्षक मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेण्यात येईल. आणि गटनेता निवड जाहिर करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

२०१४ साली राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर घेण्यात आला होता. त्यावेळी भाजपाच्या संभावित मंत्र्यासह आमदारांना वानखेडे स्टेडियमवर प्रवेश मिळाला नव्हता. तसेच या शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर भाजपा समर्थकांची गर्दी झाली होती. त्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या आझाद मैदानावर शपथविधीचा सोहळा भाजपाकडून आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला कमी गर्दी होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच आझाद मैदानावर शपथविधी सोहळा घेण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *