Breaking News

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्य दूतावासातील मो.स्यारकावी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मंत्री जयकुमार रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची युसूफ यांना माहिती दिली. नाशिकचा कांदा आणि द्राक्षे, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो. मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावे, असे आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *