Breaking News

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, विरोधकांनी आता ही एक नवी पध्दत काढलीय फडणवीसांच्या आरोपाला वळसे पाटील यांचे उत्तर

नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कथित व्हिडिओचा पेनड्राईव्ह बॉम्ब फोडत राज्य सरकारला विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच अडचणीत आणले. त्यानंतर अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चे दरम्यान शिवसेनेच्या भ्रष्टाचारी कामाकाजाची पोलखोल केली.
यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी चांगलेच उत्तर दिले असून देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या तपासाविषयी दिलीप वळसे पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्ही तो भाग सीआयडीकडे वर्ग केला आहे. सीआयडी त्याचा तपास करेल असे स्पष्ट केले.
तसेच अशा प्रकारे आरोप करून सरकारबद्दल वातावरण बिघडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी करत ते पुढे म्हणाले की, ही एक नवीन पद्धत काढली आहे. एक तर खोटे आरोप करायचे. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायची. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. जो संबंध नाही, तो जोडायचा. त्यातून सरकारबद्दल वातावरण बिघडवायचा प्रयत्न करायचा.
एकीकडे कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे लहान गोष्टींवरून मोठमोठे मोर्चे काढायचे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. मला वाटतं की सरकारची प्रतिमा असल्या गोष्टींमुळे बिघडणार नाही. आम्ही पारदर्शीपणे काम करतो आहोत. भविष्यात देखील करत राहणार असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण चव्हाणप्रकरणी दिलेल्या पेनड्राईव्हचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करत याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात जावू आणि न्यायालयात सदरचा तपास सीबीआयकडे द्यावा म्हणून मागणी करू असा इशारा दिला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *