Breaking News

देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुखांचा संदर्भ देत म्हणाले, मित्रापक्षाला सांगण्याऐवजी संजय राऊतांनी… संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्र पक्ष

बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगावात प्रचारासाठी आलो होतो. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कर्नाटकात प्रभारी होते. ते देखील सर्वत्र फिरले आहेत. मी स्वत: मराठी भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्ष सुद्धा ठामपणे उभा आहे. संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती. संजय राऊत यांच्या गटाचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. त्यांनी आपल्या मित्रपक्षाला प्रचार कुठे करा आणि कुठे करु नका, याबाबत सांगितले नाही. कारण, ते येथे काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते, अशी टीकाही केली.

बेळगावातील प्रचार सभांमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेळगावात आणि कर्नाटकातही कमळच फुललेले दिसेल. गेल्या ९ वर्षांत देशात मोठे परिवर्तन झाले आहे. गरिबांसाठी दिल्लीतून जाणारा प्रत्येक पैसा पूर्णपणे गरिबांच्या खात्यात जात आहे. दलाली आणि मध्यस्थांची संपूर्ण यंत्रणा संपविण्याचे काम मोदीजींनी केले. भारताला जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविण्याचे काम मोदीजींनी केले. मूठभर लोकांच्या तिजोरीत असलेला पैसा देशाच्या तिजोरीत आल्याबरोबर देशात झालेले परिवर्तन तुम्ही अनुभवत आहात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

जागतिक पातळीवर सुद्धा भारताची ताकद निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 370 कलम रद्द करुन देशाला सुरक्षित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधी पक्षांनी फक्त एकच काम केले, ते म्हणजे त्यांच्या सरकारांनी मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही, तरीही काँग्रेस नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. बजरंग दलावर बंदी टाकायची कुणाच्या बापाची हिंमत नाही. डोक्याला गंध लागले तर ते पुसायचा अट्टाहास काँग्रेसच्या अध्यक्षांकडून केला जातो. काँग्रेसच्या सत्तेच्या मनसुब्यांना आग लावण्याचे काम मतांच्या रूपाने तुम्हाला करावे लागेल. रामाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍यांना त्यांची जागा दाखविण्याची ही वेळ आहे. आमची संस्कृती, भारतमाता, प्रभू श्रीराम ही आमची अस्मिता आहे. त्यावर कुणी प्रश्नचिन्ह निर्माण करीत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Check Also

‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रवादीचा जाहिरनामा…

राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *