Breaking News

देवेंद्र फडणवीस यांनी मविआच्या नेत्यांना केले लक्ष्य, अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री फक्त… टीआरपीचे कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण शरद पवारांकडून घेतले पाहिजे

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपण शरद पवारांकडून घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे? असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षे आपण एक सरकार बघितलं. काय होतं त्या सरकारमध्ये? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. त्या सरकारच्या विश्वासघातापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. खंडणीखोरांपासून दाऊदशी संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळात असलेला समावेश आपण पाहिला. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षात केवळ काही तास आपण मंत्रालयात बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितली. पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणारं कांडही आपण पाहिलं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली.
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा संदर्भही वाचून दाखवला.

नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा. संजय राऊत यांना जामीन मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना जामीन मिळाला नाही तर लोकशाहीची हत्या असं जनमत तयार करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण पाहिला. पण आता या कुठल्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाही असे आवाहन करत फडणवीस पुढे म्हणाले, आता आपल्याला अलिकडच्या काळात वज्रमूठ दिसते आहे. या वज्रमुठीची काय अवस्था आहे आपल्याला माहित आहे. कुणी कुठे बसायचं? कुणी कुठे उभं रहायचं? हे सगळं काय चाललंय सांगायची आवश्यकता नाही. पण मी वज्रमुठीची दहा वाक्यं तुम्हाला सांगतो. आत्ता एक पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ‘लोक माझे सांगाती.’ मी खोटं सांगत नाही. पृष्ठ क्रमांक ३१८ आणि ३१९ यावर जे लिहिलं आहे त्यातली दहा वाक्य सांगतो. वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार, वज्रमुठीचा चेहरा उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणतात? असे सांगत शरद पवार यांच्या त्या पुस्तकातील वाक्य वाचून दाखविली.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे सगळं आम्ही म्हटलं आहे का? हे सगळं शरद पवारांनी म्हटलं आहे. आम्ही जेव्हा उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत म्हणत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवलं गेलं. चंद्रकांत पाटील यांनाही असंच म्हटलं आहे. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल जी वाक्य लिहून ठेवली आहेत त्याबद्दल मी शरद पवारांचे कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाही. एक गोष्ट तर महाराष्ट्रात लक्षातच आली नाही असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सगळे म्हणताहेत की कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. त्यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेत आपण २८ पैकी किमान २५ जागा निवडून येऊ. पण तरीही, जे लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार कराल की अल्पसंख्यांकांचं ध्रुवीकरण करून तुम्हाला निवडून येता येईल, पण हे शक्य नाही. कारण या ठिकाणी शिवरायांनी एकेक मावळा तयार केला आहे. त्याला देव, देश, धर्माकरता कसं लढायचं हे माहितेय, त्यामुळे निश्चितपणे भाजपाचा मावळा दाखवून देईल. तुम्ही कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा. लांगूलचालन करून कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. येथे एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल. दुसरा पॅटर्न येथे चालू शकणार नाही, असा इशाराही दिला.

आता हे तिघे एकत्रित येताहेत म्हणतात. आज भाजपा आणि शिवसेनेची युती अतिशय भक्कम आहे. ज्या शिवेसनेने विचारांकरता सरकार सोडलं, एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते. विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत. ज्यांनी सरकारकरता विचार सोडले ती शिल्लकसेना महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत भाजपा कोणत्याही परिस्थितीत पालिका, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभेत निवडून येईल. आपल्या निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदींची कार्यशैली, सामान्यांचा विकासाचा नरेटिव्ह आहे, असंही ते म्हणाले.

उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झाला. आपल्या बापाचं काय जातंय. बडवा जाऊन, काही हरकत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका, पोपट मेलाय. हे सरकार पूर्णपणे संवैधानिक, घटनात्मक आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण करेल. आणि पुन्हा एकदा निवडून येईल हा विश्वास मी व्यक्त करतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी, जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे. दुसर्‍यांच्या बळावर ते बनता येत नाही. कुणाचे कितीही बळ घेतले तर वाघ तर बनता येते, पण, तो वाघ सर्कशीतील असतो. स्वत:च्या बळावर वाघ झालात, तरच तो जंगलाचा राजा असतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्रात एक पक्ष भाकरी फिरविणारा दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा. पण, आपला पक्ष गरिबांच्या भाकरीची चिंता करणारा आहे, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *