भाजपाने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला. परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपाची काळी नजर आहे. परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही आणि मविआ सरकार पूर्ण ५ वर्ष चालणार, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
भंडारा येथे कार्यक्रमावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढे किमान समान कार्यक्रम राबविला जाईल. सरकारमधील तीनही पक्ष बरोबरचे भागिदार आहेत आणि त्याचा विरोधकांना त्रास होत आहे.
मविआ सरकार अस्थिर व्हावे यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करुन, राजभवनच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्याने भाजपाचा जीव कासावीस झाला आहे. परंतु महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून सातत्याने भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका आणि आरोप करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विविध विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यात येत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात भाजपाचे देवेंद्रे फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर आरोप करत मुंबई महापालिकेतील घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे राज्य सरकार स्थिर राहणार की जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगत सरकार स्थिर असल्याचा निर्वाळा दिला.
