Breaking News

भाजपा कार्यकर्त्यानो, नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हे दाखल करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या गंभीर व धोकादायक गफलतीबाबत तपास चालू असताना देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपास प्रभावित केल्याचा व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्याची सूचना आपण भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत गंभीर होती. पाकिस्तानच्या सीमेजवळ घडलेल्या या प्रकारामागे पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षितेविषयी अत्यंत गंभीर विषयावर आता सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. तसेच त्यांनी या घटनेमागे देशाच्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आपण निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. पंतप्रधानांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आहे का याचा तपास करावा, अशीही आपली मागणी आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयी जनतेची दिशाभूल केल्याबद्दल पटोले यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना आपण भाजपा कायकर्त्यांना दिले.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा अनेक दशकांचा मोठा प्रश्न सोडविल्याबद्दल आपण प्रदेश भाजपातर्फे त्यांचे आभार मानतो. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिल्यामुळे साखर कारखान्यांना आयकर विभागाने नोटिसा दिल्या होत्या. हा निर्णय १९८० च्या दशकातील आणि काँग्रेसच्या राजवटीतील होता. पण त्यामुळे साखर कारखान्यांवर टांगती तलवार होती. तसेच शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव देऊ नये, असाही संदेश त्यातून जात होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. अमित शाह यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील साखर कारखान्यांची साडेनऊ हजार कोटी रुपये देणे देण्यातून सुटका झाली व त्याचसोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळण्याची संधी निर्माण झाली. अमित शाह यांनी राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होण्याविषयी शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी जाहीर वक्तव्य केले. बिहारमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी पद सोडल्यावर त्यांच्या पत्नी राबडीदेवी मुख्यमंत्री झाल्या तसाच प्रकार राज्यात होण्याची शक्यता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वक्तव्याने निर्माण झाली. अशा स्थितीत ट्वीटरवरून कोणी तुलना केली तर सत्ताधाऱ्यांनी इतके अस्वस्थ होण्याचे कारण नव्हते. याबाबत आपण भाजपाच्या संबंधित पदाधिकाऱ्याला समज दिली आहे. तथापि, मुख्यमंत्रिपद हे सार्वजनिक पद असताना ते वैयक्तिक मालकी असल्याप्रमाणे कोणी त्याविषयी अती संवेदनशील होऊ नये असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे गुपित उघड करत पाटील म्हणाले, अन्य नेत्यांकडे पदभार द्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आग्रही मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *