Breaking News

न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले, चुकीचे असेल तर कारवाई व्हावी पण… माझ्यावरील कारवाई सूडबुद्धीने - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

मुंबई बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयानेही दरेकर यांच्यावर सोमवार पर्यत कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश राज्य सरकारला देत सोमवारी याप्रकरणी सुणावनी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले की, या कारवाईला मी मुळीच घाबरलेलो नसल्याचे सांगत चोरी करेल तो घाबरेल ना. कोणी चुकीचे करत असेल तर कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई सूडबुद्धीने नको अशी आशा व्यक्त केली.

बँकेच्या निवडणूकीत मजूर असल्याची खोटी माहिती देवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी प्रविण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी सहकार विभागानेही घेतलेल्या सुनावणीत प्रविण दरेकर हे मजूर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर दरेकर यांना कधीही अटक केली जावू शकते अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यत संरक्षण दिले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की, माझ्यावरील कारवाई सूडबुद्धीने झाली आहे. यांची राज्य सहकारी बँक असेल, मध्यवर्ती बँक असेल, बोगस कर्जे दिलीयत त्याचा लेखाजोखा मी विधीमंडळात मांडणार आहे. यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, त्या स्वत:साठी, आपल्या सगेसोयऱ्यांसाठी, आपल्या बागलबच्यांसाठी कशा वापरल्या गेल्यायत, कशी स्वत:ची कर्जे माफ करतायत या सगळ्या गोष्टींची मांडणी मी करणार आहे. स्वत: चोरी करायची आणि साप साप म्हणून भुई थोपटायची असा हा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, सत्र न्यायालयाचे मी आभार व्यक्त करतो. जे खोटे करण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारचा होता त्यावर कोर्टाने दिलासा दिला. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारचे वाभाडे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी काढत होतो. त्याचा सूड उगवायचा म्हणून अशा प्रकारची कारवाई ज्यामध्ये काही तथ्य नाही, ती करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. आम्ही न्यायालयाला पटवून दिले आणि आम्हाला सोमवारपर्यंत सुनावणी होईपर्यंत कोर्टाने दिलासा दिला आहे.

जिल्हा बँक एकच बँक नाही. सातारा बँक आहे, पुणे जिल्हा बँक आहे, सांगली जिल्हा बँक आहे, कोल्हापूर जिल्हा बँक आहे. अर्ध्या बँका सरकारमधील पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या आहेत. आता सगळ्या गोष्टीचा हिशेब चुकता होणार आहे. राज्यामध्ये सुमारे १५ ते २० हजार मजूर संस्था आहेत. प्रत्येकी २५ सदस्य आहेत. साधारणत: अडीच-तीन लाख लोकांवर गुन्हे दाखल करणार आहात का? त्यामध्ये ९० टक्के लोक राष्ट्रवादीची आहेत. जे संचालक आहेत, लेबर फेडरेशनचे लोक आहेत. जे जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करतायत. त्याची भाजपने आकडेवारी गोळा केलीय, त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

मी चार जिल्हा मध्यवर्ती बँकांची माहिती मागवली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक. ज्या दहा कारणांसाठी मुंबई बँकेची चौकशी लावली, त्या १० कारणांची मला या जिल्हा बँकांची माहिती द्या. रजिस्ट्रेशन करणारे तुमचे सहकार खातेच असते. दरवर्षी तुमचे इन्सपेक्षन होत असते, ऑडिट होत असते, इतके दिवस तुमचे सहकार खाते झोपा काढत होते काय, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, दुसऱ्यावर दगड मारताना आपल्या संस्था काय करतायत, याचाही हिशोब राज्यातील जनतेला द्यावा लागणार आहे. मुंबई बँक १२०० कोटीवर होती ती आम्ही आल्यावर १० हजार कोटींवर गेली. बँक आम्ही डुबवली नाही, लिकवीडेशनमध्ये गेली नाही. बँकेचा फयदा माझ्या कुठल्या संस्थांना देण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुमच्या बँकांचे तसे नाही. सांगली जिल्हा बँक ७५ कोटी माफ करतायत. ते कुणाचे माफ करतायत, पुढाऱ्यांच्या संस्थांचे ना. याचा हिशेब तुम्हाला द्यावा लागणार. प्रविण दरेकरकडे एक बोट दाखवले ना, चार बोटे तुमच्याकडे आहेत, असा इशाराही दिला.

राज्यातील जनतेमध्ये आणि सहकारी संस्थांमध्ये जो काही हैदोस या पुढाऱ्यांनी मांडलाय, कारखाने, जिल्हा बँक, पणन संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ असतील हे तुमचे राजकारणाचे अड्डे झालेत.  तुम्हाला पोसण्याची ही संस्थाने झाली आहेत. या सगळ्याची माहिती भाजपा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

पहिल्या ट्प्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात ४० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

देशातील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केली. महाराष्ट्रात पाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *