महाराष्ट्र भाजपाला संघटना महोत्सवाअंतर्गत १.५ कोटी नवीन सदस्यांची भरती करण्यात अडचण येत आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त ९८ लाख सदस्यांची नोंदणी झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत ५२ लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करायचे यावर सध्या भाजपामध्ये विचारमंथन सुरू आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात सदस्य नोंदणीच्या अभियानाला सुरुवात करूनही आतापर्यंत १ कोटींचा टप्पा पार पाडण्यात यश आले नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच संतापले असल्याचे आज दिसून आले.
मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या मोहिमेला मंदावलेल्या कामाला गती देण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. चर्चगेट येथील पाटणकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अनुपस्थित असलेल्या आमदारांना फटकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अनेक आमदार त्यांना मंत्रालयात भेटले, पण ते पक्षाच्या कार्यक्रमाला आले नाहीत असे सांगत भाजपा आमदारांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गैरहजर राहिलेल्या आमदारांकडून स्पष्टीकरण मागितले पाहिजे अशी सूचनाही केली.
भाजपाच्या सदस्यता नोंदणीचा मोहिमेचा कालावधी ३१ जानेवारी निश्चित करण्यात आला होता, परंतु लक्ष्य साध्य न झाल्यामुळे, अतिरिक्त १५ दिवसांचा वेळ मागण्यात आला. १.५ कोटींचा आकडा साध्य होत नसल्याचे पाहून, पक्षाने आता प्रथम एक कोटीच्या आकड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार सदस्य निर्माण करण्याचे लक्ष्य देण्यात आले. तथापि, असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे सदस्यता मोहिमेचे काम संथ गतीने सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यात खूप ताकद आहे. आपल्याला १०-१२ दिवसांत ५० लाख सदस्य जोडायचे आहेत, येत्या १५ तारखेपर्यंत आपण हा टप्पा नक्कीच पूर्ण करू.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने अतिशय गतिमान पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला लोकांमध्ये इच्छित बदल घडवून आणायचा आहे.
कार्यशाळेत, सर्व भाजपा आमदारांना सदस्य बनवण्याचे लक्ष्य देण्यात आले; याशिवाय, लक्ष्य साध्य करणाऱ्या आमदारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये, टॉप १० आमदारांची नावे घेण्यात आली, त्यापैकी औसा विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक सदस्य निर्माण केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ कोथरूड आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे, जिथून राधाकृष्ण विखे पाटील मंत्री आहेत.
भाजपा राज्य संघटना महोत्सव कार्यशाळेच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह पाच नेत्यांना सक्रिय सदस्यता फॉर्म भरण्यास सांगण्यात आले. यानंतर, फडणवीस यांनी सक्रिय सदस्यत्वासाठी मोहीम सुरू केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे मंत्री, आमदार आणि जिल्हाध्यक्ष कार्यक्रमात उपस्थित होते.
दरम्यान, ज्या आमदारांना भाजपा सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेल्या अनेक आमदारांनी भाजपाच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मंत्रालयात भेटीसाठी आले पण कार्यक्रमाकडे पाठ फिरविणाऱ्या भाजपाच्या आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच संतापले असल्याचे चित्र आज भाजपाच्या कार्यक्रमात पाह्यला मिळाले.