Breaking News

नारायण राणे यांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर, एवढी मिरची लागण्याची काय गरज? एखाद्या गुंडासारखी भाषणा केंद्रीय मंत्री बोलतायत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज गुरुवारी थेट पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर खरपूस शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे यांच्याकडे वाकड्या नजरेने बघाल, तर जागेवर ठेवणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. त्यांच्या याच वक्तव्यावर आता ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणेंना लक्ष्य केले.

शिंदे गट आणि भाजपाकडे वाकड्या नजरेने बघू नका असे नारायण राणे म्हणाले आहेत. त्याला किशोरी पेडणेकर उत्तर देताना म्हणाल्या की, नारायण राणे यांनी सुपारी घेतली आहे का ते सांगावे? तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही एका गुंडाने सुपारी घेतल्याप्रमाणे बोलत आहात. प्रत्येक पक्षाचा पक्षप्रमुख आपल्या पक्षासमोर मांडणी करत असतो. त्यांना एवढी मिरची लागण्याची काय गरज? एक केंद्रीय मंत्री सुपारी घेतल्यासारखे बोलत असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घ्यावी, अशी मागणीही केली.

वयाने वृद्ध झालेले माजी मुख्यमंत्री तसेच सध्याचे केंद्रीय मंत्री यांच्या बुद्धीत किती क्रोध आहे, हेच दिसत आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही ताळमेळ नाही असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

तसेच नारायण राणे भाजपामध्ये गेलेच आहेत. पण बंडखोरी केलेले आमदारही एकीकडे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, असे म्हणत आहेत. तर दुसरीकडे ते भाजपाची स्क्रीप्ट चालवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *