Breaking News

भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट, २५०० कोटी रूपयांच्या बदल्यात मला मुख्यमंत्री पदाची ऑफर काँग्रेसकडून चौकशीची मागणी

नवी दिल्लीतील काही लोकांनी २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते असा गौप्यस्फोट कर्नाटकातील विजयपुरा येथील भाजपाचे विद्यमान आमदार बसनगौडा पाटील-यत्नल यांनी केला. भाजपाच्या आमदाराने केलेल्या या दाव्यामुळे भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मात्र कर्नाटकातील काँग्रेस नेते डि.के.शिवकुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत कर्नाटकात प्रत्येक कामासाठी दर ठरविले जात असल्याचा आरोप केला.

मला कर्नाटकचे मुख्यमंत्री बनण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याबदल्यात त्यांनी मला २५०० कोटींची व्यवस्था करण्यास सांगितलं होते असा दावा यत्नल यांनी केला.

गुरुवारी लिंगायत पंचमसाली समाजाच्या अधिवेशनात बोलताना यत्नल यांनी दावा केला की, नवी दिल्लीतील काही लोक त्यांच्याकडे २५०० कोटी रुपये भरल्यास त्यांना मुख्यमंत्री करण्याची ऑफर घेऊन आले होते. ते म्हणाले, त्यांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भेटींचे आश्वासन दिले होते.

उमेदवारीचे आश्वासन देऊन राजकारणात अनेकांची फसवणूक होते. मी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री होण्यासाठी २५०० कोटी रुपये तयार ठेवण्यास कोणी कसं सांगू शकतं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जे लोक ५० किंवा १०० कोटी द्यायला तयार होते, त्यांना मंत्री बनवलं जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय समाजातील लोकांनी अशा आश्वासनांना बळी पडून त्यांच्या राजकीय भवितव्याला धक्का लावू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

निवडणुका जवळ आल्या की सर्व प्रकारचे उपक्रम समोर येतात. काही जण सामूहिक विवाह करतात किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षेने १५१ जोडप्यांचे लग्न लावून देतात. नोटबुक वाटप आणि इतर उपक्रमही होताना दिसतात. ऑफर केलेल्या सर्व वस्तू स्वीकारा, परंतु जे तुम्हाला चांगले भविष्य देऊ शकतात, त्यांनाच मतदान करा असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून खाली आणण्याचा मी संकल्प केला होता. येडियुरप्पा यांनी विचार केला की जर मी यत्नलला मंत्री केले तर माझ्या मुलाचे काय होईल? म्हणूनच त्यांनी माझं कोणतंही काम केलं नाही. मी त्यांना अनेक पत्रं पाठवली, पण त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलो आणि त्यांना सांगितले की ही शेवटची वेळ आहे, जेव्हा मी तुमच्या भेटीसाठी आलोय. या पुढे जोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री आहात तोपर्यंत मी तुमच्या चेंबरमध्ये किंवा कावेरी (मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान) येथे येणार नाही. तुम्हाला या पदावरून हटवल्यानंतरच मी इथे येईन असा इशारा येडियुरूप्पा यांनी दिल्याची आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृती केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितले..

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *