Breaking News

सुषमा अंधारेंचा सोमय्यांना सवाल: ज्यांच्यासाठी ५० वेळा, २० वेळा ट्विट करत पत्रकार परिषदा घेतल्या, काय झाले त्यांचे? शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्यांच्यावरील गुन्ह्यांचे काय झाले

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशास २४ तासांचा कालावधीही उलटत नाही तोच ईडीने दिड महिन्यात दुसऱ्यांदा मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील निवासस्थानावर धाड टाकत उद्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले. तत्पूर्वी ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अटक केली. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्यांच्या विरोधात आरोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी शिवसेना सोडताच त्यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले असा थेट सवाल केला.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, सोमय्या यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप केले. त्यांच्या विरोधात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या. अनेक ट्विट केले. पण ते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला आल्यावर त्यांच्याविरोधात सोमय्या बोलत नाही. याचा अर्थ काय होतो? ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात वारंवार हस्तक्षेप करणारे सोमय्या कोण आहेत? सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत की अतिक्रमण विभागाचे कर्मचारी? असा खोचक सवाल केला. त्याचबरोबर सोमय्या यांनी कुणाविरोधात किती पत्रकार परिषदा घेतल्या याची जंत्रीच सादर केली.

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांची पोलखोल केली. सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात २२ पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्याविरोधात ८, यशवंत जाधव यांच्याविरोधात १६, अर्जुन खोतकर यांच्या विरोधात ९ आणि आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात ६ पत्रकार परिषदा घेतल्या. तसेच भावना गवळी यांच्या विरोधात १२४ ट्विट केले. अडसूळ यांच्याविरोधात २०, सरनाईक यांच्याविरोधात ५५, खोतकर यांच्या विरोधात १५ आणि यशवंत जाधव यांच्या विरोधात २१ ट्विट केले. सोमय्यांना बाकी काही काम नाहीये का? की भाजपाने आरटीआय टाकण्यासाठी माणूस ठेवला आहे काय? असा उपरोधिक सवालही केला.

खेड प्रकरणात सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाली. या प्रकरणात सोमय्या दापोलीत कितीवेळा गेले. खेड दापोलीत सोमय्या ११ वेळा गेले. ईडीने दापोलीला भेटी दिल्या असत्या तर समजू शकते. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असत्या तरीही समजू शकले असते. पण किरीट सोमय्या कोण आहेत? ते ईडीचे कर्मचारी की अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आहेत का? सोमय्या ईडी आणि अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षेत्रात ते ढवळाढवळ करतातच कसे?, असा सवाल अंधारे यांनी केला.

सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आरोप केले. त्यांना त्रास देण्याचं काम केलं. नंतर भावना गवळींनी शिवसेना सोडली. त्यानंतर भावना गवळींचं पुढे काय झालं? असा सवाल त्यांनी केला. कंत्राटी कामगार नेमले जातात तसं त्यांनी कंत्राटी खासदार नेमला असावा. यामिनी जाधवांवर निवडणूक पत्रात मालमत्ता लपवल्याचा सोमय्यांचा आरोप होता. आता पुढे काय झालं? सदानंद कदमांकडे डायरी सापडली अशीच डायरी यशवंत जाधवांकडे होती त्याचं काय झालं? अनिल परबांवर त्यांचा निशाणा होता. अनिर परब जर भाजपकडे गेली तर डायरी गायब होईल का? असा सवाल त्यांनी केला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *