Breaking News

‘बजरंगा’ ची भलामण करणाऱ्यांना कर्नाटकी हिसकाः जाणून घ्या मतांची टक्केवारी भाजपा ६४ वर गारद तर काँग्रेसची १३६ वर विजय, जेडीएस अवघ्या २० जागांवर समाधानी

देशाच्या सार्वत्रिक निवडणूकीला अवघा एक वर्ष राहिलेला असताना कर्नाटक विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीची मतमोजणी सकाळी सुरु झाली. सकाळपासूनच कर्नाटकातील २२४ पैकी ११६ ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे तर ७० जागांच्या आसपास भाजपा आणि २७ जागांवर जेडीएस या पक्षाची आघाडी असल्याचे केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत होते. दुपारनंतर काँग्रेस सातत्याने ११० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर राहिल्याने काँग्रेसला जेडीएसची मदत घ्यावी लागेल की काय अटकळ बांधली जात होती. मात्र अखेर संध्याकाळपर्यंत काँग्रेसने १२३ जागा जिंकल्या तर १३ ठिकाणी आघाडीवर तर भाजपाने ५६ ठिकाणी विजयी आणि ८ जागांवर आघाडी असल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक निकाल पत्रात जाहिर केले. त्यामुळे बजरंग बलीच्या नावाखाली धार्मिक तुष्टीकरणाला आणि फोडा-फोडीच्या राजकारणाला कर्नाटकच्या जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले.

या निवडणूकीत काँग्रेस पक्षाला ४३.३ टक्के मते मिळाली आहेत. तर भाजपाला ३५.८८ टक्के मते मिळाली आहेत. तर जेडीएस पक्षाला १३.३१ टक्के मते मिळाली आहेत. या निवडणूकीत आम आदमी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भाकप आणि माकप, एआयएमआयएम, एआयएफबी आदी पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले होते. मात्र या पैकी एकाही राजकिय पक्षाला १ टक्के मतांचा टप्पा ओलांडता आला नाही.

साधारणतः मागील दोन वर्षात बोम्मई यांच्या निमित्ताने नेतृत्व बदल करत भाजपाने कर्नाटकात हिजाबचा मुद्दा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा आणि शेवटी शेवटी तर गुजरात दंगलीत आणि केरळमधील ख्रिश्चन समुदायाच्या विरोधात हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्या बजरंग दलाला राजकीय अधिस्विकृती मिळवून देण्यासाठी बजरंग बली की जय अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देत हिंदूत्वाला अप्रत्यक्ष चुचकारण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याबाजूला देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आली तर जातीय दंगली घडतील असे गंभीर वक्तव्य केले.

मात्र मतदारांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या या दोन्ही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काँग्रेसच्या पारड्यात भरूभरून मताचे दान टाकले. याशिवाय दुसऱ्याबाजूला कर्नाटकातीलच कोलार येथील २०१९ च्या निवडणूकीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून गुजरात न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर राहुल गांधी यांची रद्द केलेली खासदारकी या सगळ्या गोष्टींचा परिणाम या निवडणूकीत प्रामुख्याने दिसून आल्याचा परिणाम या निवडणूकीत दिसून आला.

काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासात अलिकडच्या काळात माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांचा अपवाद वगळता गांधी घराण्या व्यतिरिक्त सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे आहेत. खर्गे हे कर्नाटकचेच असल्याने त्यांच्या होम टर्फवर काहीही करून विजय मिळवायचा आणि काँग्रेसला सत्ता मिळवून द्यायची यासाठी ते संपूर्ण निवडणूक कालावधीत ते ठाण मांडून बसले होते. तसेच त्यांच्या जोडीला राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि.के.शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनीही राजकिय एकता दाखवित काँग्रेसला एकहाती पूर्ण बहुताचे सरकार आणण्यात मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *