Breaking News

जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, वाल्मिकी कराडवर मोक्का कधी लावणार? वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. वाल्मिकी कराड हा ३०२ चा आरोपी होता, पण त्यात त्याचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी आका काका म्हणणारा नाही, मी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड या प्रकरणात आरोपी आहे, मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नाहीये. कारण लोकांची मेमरी शॉर्ट आहे, ज्यामुळे काही दिवसांमध्ये लोक ते विसरून जातील, याची वाट सरकार पाहात आहेत. तर, या हत्याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये वाल्मिकी कराडचे नाव नाही. बीड प्रकरणामध्ये आपल्या पक्षातील एका मंत्र्यावर सातत्याने आरोप होत आहेत. त्यामुळे पक्ष अध्यक्ष म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा घेणे हे अजित पवार यांचे कर्तव्य असल्याची आठवणही यावेळी करून दिली.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना बीड प्रकरणाची स्वतंत्र न्यायाधीशांद्वारे चौकशी होईल आणि आरोपींवर मोक्का लावला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. तरी काहीच हालचाल नाही? खरंतर २४ तासांत ते फाईल व्हायला हवं होतं. सत्ताधारी दाऊदला फरफटत आणणार होते, पण वाल्मिकला ते आणू शकले नाहीत. पॉलिटिकल अंडरस्टॅन्डींग शिवाय हे शक्य नाही. त्यामुळे वाल्मिकी कराड हा सरकारपेक्षा मोठा आहे, असे वातावरण त्यांनी तयार केले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यभरातील अर्ध्याहून अधिक बूथ रिव्हॉल्वरधारी लोकांनी कॅप्चर केले होते. पण माध्यमांसमोर हे कधी आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात लोकशाहीसाठी ही अत्यंत वाईट गोष्ट असल्याची खंतही यावेळी व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीच जबाबदारी घेतलेली नाही. उलट सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांना डोळ्याने खुणावले होते. यामागे त्यांचा उद्देश काय होता? हे मला माहिती नाही, असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पण ज्यावेळी शरद पवार साहेबांचे सरकार होते, त्यावेळी अण्णा हजारेंनी आरोप केल्यावर शरद पवार साहेबांनी सुरेश जैन, नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, विजयकुमार गावीत यांचे राजीनामे घेतले होते, अशी आठवणही यावेळी अजित पवार यांना करून दिली.

मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, केरळ हे राज्य साक्षरता व शिक्षणाच्या बाबतीत नंबर एकचे राज्य आहे. सर्वात जास्त सुशिक्षित लोक तिथे राहतात. भारतात सर्वात जास्त फॉरेन करन्सी आणणारे हे राज्य आहे. ते दहशतवादी राज्य कसे होऊ शकते? कारण त्यांनी भाजपाला कधी निवडून दिले नाही जातीयवादी मतदार तिथे नाहीत अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *