दिल्लीतील एका कार्यक्रमात महादजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान केला. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. त्यातच संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड य़ांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे मध्यंतरी अजित पवार यांना भेटले आम्ही आक्षेप घेतला का असा सवाल उपस्थित केला.
राजकारणातली कटुता संपविण्यासाठी संवादाचे पुल बांधणे गरजेचे असल्याचे सांगत शरद पवार यांनी कुणाला भेटावे आणि कुणाला भेटू नये हे कुणी सांगू नये असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, ज्यांनी काल शरद पवार यांच्यावर टीका केली, त्यांनाही माहिती आहे की बाळासाहेबांची सुद्धा पवारांसोबत मैत्री होती. शरद पवार यांची राजकीय आणि सामाजिक उंची पाहून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आमच्या समोर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मी म्हणालो होतो की भेटलेच पाहिजे. मागे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मग त्यावेळी आम्ही आक्षेप नोंदवला नव्हता. कोणालाही उचलायचे आणि कुणालाही जेलमध्ये टाकायचे, अशा सध्याच्या राजकारणाला शरद पवार यांची विचारधारा छेद देते, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर निपुत्रिक असल्याची टीका केली होती. १९४२ च्या आंदोलनात पोलिसांनी वेणुबाईंवर लाठीचार्ज केल्याने त्यांना पुत्रप्राप्ती होऊ शकत नाही, असे ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी आचार्य अत्रे यांना सांगितले, त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली होती. ही राज्याची संस्कृती आहे. इथे विरोधकांमध्येही संवाद आणि सन्मान होतो, असेही यावेळी सांगितले.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचं राजकारणातील स्थान, त्यांच्याशी विचारांची उंची ही अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की, त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. आम्हाला कधी कधी राग येतो की हे असं का करतात. पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. शरद पवार तिथे जातील, असं वाटतं नाही, अशी महाराष्ट्रात अनेक उदाहरण आहेत. ज्या माणसाने शरद पवार यांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्ष, निशाणी पळवली सर्व केले पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही. हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे असा उपरोधिक टोलाही यावेळी संजय राऊत यांना लगावला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, खोट्या पोलीस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांच्या राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक हे जे पाच दहा सुरु झालंय. ते शरद पवार यांना स्पर्श सुद्धा करत नाही, शरद पवार कुठल्या व्यासपीठावर जातात याचा कोणी विचारही करू नये. प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेतो हा काय शब्द आहे का? असं काय मोठं केलंय त्यांनी, पण जेव्हा लढायची वेळ येईल. त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त ॲग्रेसिव्ह हे शरद पवार असतील असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे उदाहरण आहे. राजकारण म्हणजे फक्त, सूड, द्वेष, संपवून टाका, मारून टाका असं नाही. आपण सर्व एकमेकांना भेटता, एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी, अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही, पण मी अनेक पत्र पाठवून झालंय. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की, परवा पण त्यांचा परवा कधीच येत नाही. अमित शाह याला तडीपार बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती पण शरद पवार बोलले, त्यांना जिथे वार करायचा तिथे ते करतात, असेही यावेळी सांगितले.