Breaking News

अवाढव्य वीज दरावरून जयंत पाटील यांचा सरकारला सवाल, वीज महाग का? सरकारकडे प्रचंड बहुमत, अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी

राज्यातील अवाढव्य वीज दरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला घेरले आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या विज महाग मिळत आहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच आताच्या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे त्यामुळे वीजदर कमी करण्यात आता कोणतीही अडचण नसावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात वीज बिलात ३०% कपात करणार असे महायुती सरकारमधील लोकं मागच्या ४-५ महिन्यांपासून म्हणत आहेत. ३०% कपात सोडाच पण इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात सध्या वीज महाग मिळत आहे.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राजस्थानमध्ये प्रति युनिटला ७.५५ – ८.९५ रुपये मोजावे लागत आहेत, तर मध्य प्रदेशमध्ये ३.३४ ते ६.८० रुपये मोजावे लागत आहेत. शेजारच्या कर्नाटक राज्यात तर सरसकट प्रति युनिट ५.९० रुपये आहेत. सर्वात जास्त वीजदर म्हणजे प्रति युनिट ५.१६ ते १७.७९ रुपये महाराष्ट्रात मोजावे लागत आहेत.

शेवटी बोलताना जयंत पाटील त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले की, वीज बिलात ३०% कपात करणार, पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असे म्हणणारे आज प्रचंड बहुमताने सत्तेत बसले आहेत. सध्या राज्यात असलेले अवाढव्य वीजदर कमी करण्यात आता सरकारला कोणतीही अडचण नसावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *