Breaking News

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या स्मारकाचे व त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा.प्रितम मुंडे, खा.हेमंत गोडसे, आमदार ॲड.माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, ॲड.हेमंत धात्रक, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, कार्यक्रमाचे आयोजक उदय सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना छगन भुजबळ अतिशय भाऊक झाल्याचे बघावयास मिळाले. ते म्हणाले की, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठा धक्का आहे. ज्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील माझे मोठे भाऊ मगण भुजबळ यांचं दुःखद निधन झालं त्यावेळी मला अतिशय दुःख झालं होत. त्यानंतर माझे धाकटे भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर माझा धाकटा भाऊही गेल्याने मला अतिशय तीव्र असे दुःख झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करत असताना ते अतिशय भाऊक झाले.

ते म्हणाले ही, अतिशय लहान समाजातून पुढे येत स्व.मुंडे साहेबांचे नेतृत्व निर्माण झालं होत. आपलं आयुष्य सर्व सामान्य जनतेसाठी, कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या हितासाठी अर्पण केलं. राज्यात माधव हा गट उभा करण्यात स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोलाचं योगदान दिलं. ओबीसी चळवळीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. खासदार समीर भुजबळ यांनी ओबीसींच्या जनगणनेचा प्रस्ताव पुढे ठेवला तेव्हा आपल्या पक्षाच्या भूमिकेचा विचार लक्षात न करता ज्याप्रमाणे जनावरांची तुम्ही मोजणी करू शकता तर ओबीसी बांधवांची का नाही असा सवाल लोकसभेत उपस्थित करत ओबीसींच्या जनगणनेसाठी त्यांनी लढा दिला. आज ते असते तर हा प्रश्न देखील लवकरच सुटला असता अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेल मध्ये गेले नसते. पहाडासारखा हा माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता. राज्यातील गोर गरीब मागासवर्गीय जनतेचे सेवा करण्याचं काम त्यांनी केलं ते काम तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे आहे. त्यांचा वारसा आणि त्यांचं काम पंकजाताई अतिशय प्रभावी पणे पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी ते काम करतील आणि ओबीसींना योग्य न्याय देतील असा विश्वास आहे. तसेच स्व.गोपीनाथरावांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्मृतींचा उजाळा देण्याचे काम आपल्याला सातत्याने करावे लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *