Breaking News

मलिकांचा भंडाफोड आणि अजित पवारांच्या नातेवाईकांवर आयकरची कारवाई हे तर खालच्या पातळीवरचे राजकारण-प्राप्तिकर विभागाच्या धाडीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे-कोल्हापूर-मुंबईः प्रतिनिधी
एनसीबीने आर्यन खान, अब्बास मर्चंट यांच्यावर केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत याचा संबध भाजपाशी असल्याचा आरोप केला. यास काही तासांचा अवधी उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्याने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
आज सकाळपासूनच प्राप्तीकर विभाग आणि ईडीकडून राजकिय व्यक्तींच्या उद्योग आणि घरांवर मोठ्या प्रमाणावर धाडी पडणार असल्याचे संदेश अनेकांच्या मोबाईलवर खणखणायला सुरुवात झाली. त्या अर्थी या तपास यंत्रणांकडून कोणत्या राजकिय नेत्यांवर धाडी पडणार याची उत्सुकता निर्माण झाली. मात्र काहीवेळानंतर लगेच अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापूर येथील बहिणींच्या घरावर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या.
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळते आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचे समजते.
दरम्यान अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर देखील प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकरचे अधिकारी पोहचले आहेत. तर विजया पाटील या पुईखडी इथल्या घरात उपस्थित आहेत.
यासंदर्भात अजित पवार म्हणाले की, माझे नातेवाईक आहेत आणि ज्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही अशांवर धाड टाकली असेल तर हे खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. कुठल्या स्तरावर जाऊन वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जात आहे, याचा विचार राज्यातील जनतेने जरूर केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
अनेक सरकारे येत जात असतात. शेवटी जनता सर्वस्व आहे. जनता योग्य निर्णय घेते. गेल्या निवडणुकीच्या अगोदर पवारसाहेबांचा बँकेशी संबंध नसतानाही ईडीने नोटीस काढली होती. त्यातून रामायण म्हणा किंवा राजकारण म्हणा जे घडले आणि जनतेने बोध घेतला, असे सूचक विधानही त्यांनी केले.
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने आज धाडी घातल्या. हा कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी जरंडेश्वर कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली.
आयकर विभागाने इतर कंपन्यांवर धाडी टाकल्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते करु शकतात. परंतु ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर धाडी टाकल्या त्याचे वाईट वाटले, असेही ते म्हणाले.
माझ्या संबंधित कंपन्यांवर धाड टाकली म्हणून मला काही म्हणायचे नाही. मी एक नागरिक आहे. मात्र एका गोष्टीचे दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षापूर्वी लग्न झाली, सुखाने संसार करत आहेत. त्यांच्या मुलांची लग्न होवुन नातवंड आहेत. एक बहीण कोल्हापूर आणि दोन बहिणी पुण्यात आहेत. त्यांच्यावर धाडी टाकल्या आहेत. या धाडीच्या पाठीमागचे कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना शंका आली म्हणून त्यांनी छापेमारी केली. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी कर भरणारे आहोत. कारण मी स्वतः अर्थमंत्री आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची, कर चुकवायचा नाही, कर व्यवस्थितपणे कसा भरायचा हे मला माहीत असल्याचा उपरोधिक टोलाही भाजपाला त्यांनी लगावला.

Check Also

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *