Breaking News

अजित पवार यांचा सवाल, भाजपावाल्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे झाले ते योग्य का? सभागृहातच सवाल करताच भाजपाने बाके वाजवून दिले उत्तर

राज्यात झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून गेले. त्यामागे भाजपाचा हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतच भाजपाच्या सदस्यांना खोचक सवाल करत भाजपा वाल्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगावे की, मागील १० दिवसात जे काय झाले ते योग्य आहे का? असा सवाल केला.

त्यामुळे भाजपाच्या सदस्यांकडून अजित पवारांच्या या सवालाला प्रत्युत्तर देत बाके वाजवून एकप्रकारे योग्य समर्थन असल्याचे स्पष्ट केले. मात्र या प्रत्युत्तराने अजित पवार शांत बसतील ते कसले. त्यावरूनही अजित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणाले, दादा इतकेही बाके वाजवून स्वागत करू नका. तुमचे तर मंत्रीपद येईल का? याची शाश्वती नाही असा खोचक टोला लगावला.

विधानसभा अध्यक्ष पदावर भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या त्यांच्या अभिनंदनापर ठरावावर ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

भाजपाच्या पहिल्या बाकावर बसलेल्यांची पहिली रांग जरी पाहिली तर सगळे आमचेच दिसत असून बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत यासह बाकीची मंडळी आमच्यातूनच गेली. मात्र या रांगेकडे पाहिल्यावर मला भाजपाच्या निष्ठावंतांबाबत दु:ख वाटत असल्याचा टोला लगावत ते म्हणाले, त्या निष्ठावंतानी किती वर्षे सतरंज्या उचलल्या असतील पक्षासाठी उभी ह्यात घालविली असेल. मात्र ते आता कुठेच दिसत नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राहुल नार्वेकर हे खरे तर आमचे जावई, त्यांचे सासरे आमच्या पक्षात असून विधान परिषदेचे ते सभापती आहेत. त्यामुळे त्यांचे जावई म्हणजे आमचे जावईच. त्यामुळे इतक्या दिवस आम्ही त्यांचा जावई म्हणून जसा हट्ट पुरविला. तसे आता त्यांनी आमचा हट्ट पुरवावा अशी मिश्किल टिपण्णी करत विधानसभा अध्यक्ष पदावर आपण विराजमान झालेले असल्याने आपण सर्व सदस्यांना योग्य आणि समसमान न्याय द्याल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राहुल नार्वेकर यांचे एक वैशिष्ट असून ते ज्या पक्षात जातात त्या पक्षातील नेत्यास आपलेसे करतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही राहुल नार्वेकर यांना आपलंस करावे अन्यथा काही खैर नाही असा टोला लगावत अप्रत्यक्ष तुम्ही बंडखोर आहात आणि त्यावरील निर्णय घेण्याचा अधिकार नार्वेकर यांनाच असल्याचे एकप्रकारे सुचित केले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *