Breaking News

आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, फडणवीसांच्या त्या बैठकीनंतरच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र लिहिल्याचे दाखविले जाहिर

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जवळपास चार मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प शिंदे-फ़डणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतरच गेल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातून गुजरात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतरच तो गुजरातला गेल्याचा गंभीर आरोप केला.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधारात ठेवून वेदांता-फॉक्सकॉनच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही केला. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १०० टक्के येणार होता. पण फडणवीसांच्या बैठकीनंतर ऐनवेळी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांच्याकडून काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातंर्गत एक याचिका दाखल करण्यात आली होती. या आरटीआयला सरकारी विभागाकडून उत्तर आले. त्यामध्ये एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख आहे. आम्ही २९ सप्टेंबरला आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. त्याला दीड महिन्यांनी उत्तर देण्यात आले. त्यामध्ये उपलब्ध झालेल्या पत्राच्या आधारे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प १०० टक्के महाराष्ट्रातच येणार होता, याचा पुरावा समोर आला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प मविआच्या काळात गुजरातला गेला होता, हा भाजपाचा प्रचार खोटा आहे, हे या पत्रामुळे उघड होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

आरटीआयमध्ये असलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीच्या सीईओंनी अनिल अग्रवाल यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये अनिल अग्रवाल यांना सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आले होते. एखाद्या प्रकल्पासाठीची जागा आणि इतर वाटाघाटी झाल्यानंतर सामंजस्य करार केला जातो. याचा अर्थ वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे निश्चित असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रानुसार, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी २६ जुलैला मंत्रालयात पहिली बैठक झाल्याचे दिसते. तर दुसरी बैठक २९ ऑगस्ट रोजी झाली होती. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनचे अधिकारी देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. ही बैठक नेमकी कुठे आणि कशासाठी झाली होती? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात ठेवण्यासाठी ही बैठक होती की, महाराष्ट्रा येऊ घातलेला प्रकल्प गुजरातला पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही बैठक घेतली होती, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

या बैठकीविषयी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होती का? त्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून ब्रीफ करण्यात आले होते का?, असा सवालही त्यांनी फडणवीस यांना केला.

भाजपाचे नेते सांगतात की, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात गुजरातमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. महाविकास आघाडी सरकारने प्रयत्नच न केल्यामुळे हे घडले, असा आरोपही होतो. मग हा प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नव्हता तर मग एमआयडीसीकडून अनिल अग्रवाल यांना सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी पत्र का पाठवण्यात आले? मग आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत खोटं बोलत होते का? या सगळ्याविषयी आता घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन उत्तरं द्यावीत. मी त्यांना समोरासमोर चर्चा करण्यासाठी आव्हान देतो. त्यांनी महाराष्ट्रातील बडे प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले, याबाबत माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत, असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.

 

Check Also

अजित पवार यांची माहिती,… समाधान होईल अशा जागा मिळणार

२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *