Breaking News

आशिष शेलार म्हणाले, …म्हणून उद्धव ठाकरेंना नाकारले…५० चा आकडाही पार नाही करू शकत राज ठाकरे यांनाही दिला इशारा

गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली.

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पुनम महाजन, खा. मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, आ. अमित साटम, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, आ. पराग अळवणी, आ. कालिदास कोळंबकर आ. मनीषाताई चौधरी, आ. भारती लव्हेकर, आ. विद्या ठाकूर, आ. राजहंस सिंह, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्राताई वाघ, माजी खा. किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.

…म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, १९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की … उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले.

पुढे टीका करताना आशिष शेलार म्हणाले, मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे… पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही म्हणाले.

राज ठाकरेंना कानपिचक्या

पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिला.

२ हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे ‘क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते. ६ लाख ३२ कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील; जर व्यवस्थेत असतील तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचं काम आहे, हे जनतेला हवे आहे… चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही ते म्हणाले.

मोदी जे करतात ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचं प्रामाणिकतेने स्थान मिळालं पाहिजे म्हणून करतात. टीका करणाऱ्यांच स्वागत तर आहेच पण कधी कधी असं वाटतं आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, असेही आ. अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले.

काय होतास तू काय झालास तू…

ते चित्र ज्यावेळी आम्ही टीव्हीवर वर्तमानपत्रात पाहिलं मविआची बैठक…  शरद पवार यांची होती. या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती त्यानंतर सोफ्यांची रांग होती… या सोफ्यावर बसलेल्या उद्धवजींना पाहिलं आणि मला गाणं आठवलं ‘कोण होतास तू काय झालास तू…’ ज्यावेळी आमच्यासोबत होतात; त्यावेळी देशाचं नेतृत्व तुमच्याकडे येत होतं. आज आम्हाला सोडून गेलात तर केजरीवाल ते केसीआरपर्यंत सतत सगळीकडे जावं लागतय. आमच्याबरोबर होतात तेव्हा खुर्चीचा सन्मान होता. आता तुम्हाला सोफ्याच्या रांगेत बसावं लागतंय. आमच्याबरोबर होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमच्या सभा व्हायच्या. बीकेसीची चार मैदाने भरायची. आम्हाला सोडून गेलात तर तीन पक्ष एक होऊनसुद्धा आम्ही जे मैदान पार्किंगसाठी वापरलं तिथे तुमची सभा होते. मुंबईकरांच्या प्रती आपलेपणा तुम्ही सोडला आहे आणि म्हणून आता ‘सरकार आपल्या दारी’ च्या माध्यमातून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर मुंबईकरांच्या समस्या गाऱ्हाणे ऐकून घेतात.

पावसाआधी मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यावर भारतीय जनता पार्टीची माणसं जातात. एसी घरात बसलेले आदित्य आणि उद्धव ठाकरे याचे उत्तर देतील का? तुम्ही का नाल्यावर आला नाहीत? राज्यात सरकार हवं म्हणून आक्रोश करताय मुंबईकरांच्या समस्या ऐकून घ्यायला तुम्ही रस्त्यावर दिसत नाहीत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी १५१ चा आकडा भाजपा, शिवसेना, रिपाई आणि एनडीए भाजपा महापौराच्या नेतृत्वात दिसेल आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र ईव्हीएममध्ये गडबड आहे का ? याचे क्लास करत बसतील हे चित्र मी आजच स्पष्ट करतो. त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांची संपूर्ण ताकद लावा असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.

Check Also

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *