Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते पदी जितेंद्र आव्हाड तर मुख्य प्रतोद पदी रोहित पाटील यांची नियुक्ती

राज्यातील विधानसभा निवडणूकीत महायुतीने संशयातीत जागा मिळवित बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. या पार्श्वभूमी महाविकास आघाडीला विधिसभेतील गटनेते, मुख्य प्रतोद आदी पदांच्या जबाबदारीसाठी ज्येष्ठांबरोबर नवख्या आमदारांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या गटनेते पदी मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आल्याचे जाहिर केले. तर विधिमंडळात पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी आर आर पाटील यांचे चिरंजीव तसेच राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले रोहित पाटील यांची पक्षाच्या मुख्य प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नव्याने निवडूण आलेले माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांची प्रतोद पदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना जंयत पाटील म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पाच वाजल्यानंतर ८ टक्केपेक्षा जास्त मतदान वाढले. हे अचानक वाढलेले मतदान प्रश्न निर्माण करते. त्यामुळे निवडणूका पारदर्शी आणि विश्वासार्ह व्हाव्यात यासाठी निवडणूका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणूकीत मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद करण्यात आली होती. हे चूकीचे असून आयोगाकडून एकप्रकारे माहिती दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोपही यावेळी केला.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, या निवडणूकीत भाजपा आणि महायुतीला जरी जास्त जागा मिळाल्या आणि आमची संख्या कमी असली तरी आम्ही लोकांचे प्रश्न धडाडीने मांडू अशी ग्वाहीही यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *