मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ प्रति युनिट पर्यंत तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ रु. प्रति युनिट पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, एक एप्रिल पासून महावितरण च्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील. अशी माहिती महावितरण चे स्वतंत्र संचालक व भाजपा प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी दिली.
पुढे बोलताना विश्वास पाठक म्हणाले की, १०० युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर ५ रु. ८७ पर्यंत तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा दर ११.८२ रु. पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव महावितरण ने राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला असल्याचे नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वास पाठक बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा निर्मितीच्या धडाकेबाज कार्यक्रमामुळेच शेतकरी , घरगुती व औद्योगिक ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे विश्वास पाठक यांनी स्पष्ट केले .
विश्वास पाठक पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेमुळे राज्यात आगामी दोन वर्षांत १६ हजार मेगावॅट एवढी सौर वीज निर्मिती होणार आहे. त्याचा मोठा फायदा महावितरणला होणार आहे. महावितरण चा
सरासरी वीज पुरवठ्याचा दर कमी होणार असल्यामुळे १०० युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज दर ७ रु. ६५ पैशापासून (प्रती युनिट) ५ रु. ८७ पैसे पर्यंत म्हणजेच २३ टक्क्यांनी कमी होतील तर १०१ ते ३०० युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे दर सरासरी १३.४९ रु. प्रति युनिट रु.११.८२ पर्यंत म्हणजेच १२ टक्क्यांनी कमी होतील, अशी आशा व्यक्त करत औद्योगिक ग्राहकांसाठीच्या सर्व सवलत, प्रोत्साहन योजना चालू ठेवण्यात येतील तसेच औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी देण्याची गरज पडणार नसल्याची माहितीही दिली.
पुढे बोलताना विश्वास पाठक यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे अनेक फायदे पुढील पाच वर्षांत ग्राहक आणि महावितरणला होणार आहेत. महावितरण चा सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्याच्या ९ रु. ४५ पैसे या दरावरून २०२९-३० पर्यंत ९ रु. १४ पर्यंत खाली येणार असल्याचेही यावेळी सांगितले.