राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भोंग्याच्या संदर्भात नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका मांडताना म्हणाले की, भोंग्याप्रश्नी राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांची एक बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत त्या विषयीची मते जाणून घेतल्यानंतर यासंदर्भातील अधिक मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली जारी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
मस्जिदीवरील भोंग्याचा विषय हा काही नवा विषय नाही. २००५ साली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर २०१५ आणि २०१७ साली यासंदर्भात जीआर निघाले. त्या जीआरमध्ये लाऊडस्पीकरच्या वापरासंदर्भात परवानगीची पध्दत ठरवून देण्यात आली. परंतु यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व राजकिय पक्षांची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच याबैठकीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाही बोलाविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांची परवानगी घेवूनच भोंगे लावायला हवेत. ज्यांना परवानगी नाही त्यांनी भोंगे लावायला नाही पाहिजेत. लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वी जाहिर केलेल्या नियमावलीनुसारच भोंगे लावावेत असे सांगत राज्य सरकारने कोणते भोंगे काढावेत कोणते ठेवावेत याचा प्रश्न निर्माण होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भोंग्याच्या प्रश्नावरून कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या काहीजणांकडून सुरु आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असा आवाहन करत जो काही तसा प्रयत्न केल्यास संघटना असो किंवा पक्ष असो किंवा व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिलीप वळसे पाटील