Breaking News

फडणवीसांच्या पहिल्या पेन ड्राईव्हची चौकशी सीआयडीकडे, पण महाजन सुटले तर आनंदच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उत्तर

राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासोबत हात मिळवणी करून कट कारस्थान रचली जात असल्याचा आरोप पहिल्या पेन ड्राईव्हद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस केला. त्याची चौकशी सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रविण चव्हाण याने आपल्या वकील पदाचा राजीनामा दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

मात्र भाजपा आमदार गिरीष महाजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सांगायचे झाले तर ती शिक्षण संस्था २०१७ साली स्थापन झाली. त्या संस्थेच्या शाळेला ३०० दिवसांपेक्षा जास्त आणि यापुढेही बंदोबस्त पुरवु मात्र ती सुरू करावी लागली. त्यामुळे गिरीष महाजन निर्दोष सुटले तर आम्हाला आनंदच होईल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २९३ च्या कायदा व सुव्यस्था या विषयावरील चर्चेदरम्यान विधानसभेत एक पेन ड्राईव्ह सादर करत राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी कट कारस्थान रचत असल्याचा आरोप करत या कामासाठी राष्ट्रवादीतील नेते एकनाथ खडसे, अनिल देशमुख, शरद पवार यांच्यासह बड्या नेत्यांची नावे विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी घेतल्याचे स्टींग ऑपरेशनद्वारे घेतलेले व्हिडीओमधील संभाषणही त्यांनी त्यावेळी वाचून दाखविले होते. या प्रमुख प्रश्नासह अनेक प्रश्नावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तर दिले.

तुम्ही (फडणवीस) तुमच्या भाषणात म्हणाला होतात की, तुम्हाला राज्यातील पोलिसांचा अभिमान आहे. तुम्हाला त्यांचा गर्व वाटतो. पण तुम्हीच राज्यातील पोलिसांचे खच्चीकरण करण्याच्या अनुषंगाने तुम्हीच बाहेर आणलेल्या प्रकरणात राज्यातील पोलिसांकडून चौकशी नको म्हणता. हा एक प्रकारे राज्यातील पोलिसांवर अविश्वासच असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

तुम्ही ॲटालियाशी संबधित एक प्रकरण पुढे आणले. त्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली. त्यात मनसुख हिरेन याची हत्या झाली. ही केस एनआयएकडे हस्तांतरीत झाली. त्यानंतर ईडीची रेड झाली. आतापर्यंत अनिल देशमुख यांच्याबाबत कोणते ठोस पुरावे ईडी आणि एनआयएला मिळाले याची माहिती अद्याप तरी राज्य सरकारकडे आली नाही. मात्र एखाद्याला संपवायचे असेल तर अशा यंत्रणा आणून त्याला संपविण्याचा चांगला प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

तुम्ही१९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या घटनेचा उल्लेख करता. मात्र त्या घटनेत उशीराने गुन्हा दाखल करून नवाब मलिक यांना तुम्ही अटक केलीत. वास्तविक पाहता या प्रकरणात अनेक जण अटक झाली अनेकांना शिक्षा झाली. मात्र मलिक यांच्याकडून सातत्याने केंद्र सरकारच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आवाज उठविला जात असल्यानेच त्यांचे तोंड बंद करण्यासाठीच केंद्रीय यंत्रणे मार्फत कारवाई केल्याचा आरोप करत मग तुम्ही पाच वर्षे सत्तेत असताना मलिक प्रकरणाची चौकशी का केली नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ती चौकशी तुमच्या सरकारच्या काळात झाली असती तर अधिक बरे झाले असते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईत मृत्यू पावलेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या संदर्भातील गुन्हा तुम्ही बिहारमध्ये नोंदविला. ती केस सीबीआयकडे दिली. काय आले त्यांच्या तपासातून काहीही नाही. अगदी त्याच धर्तीवर गिरीष महाजनांच्या संदर्भातील गुन्हा हा पुणे येथे नोंदवण्यात आला आणि त्याचा तपास जळगावात सुरू करण्यात आला. गिरीष महाजन त्या गुन्ह्यातून निर्दोष बाहेर आले तर मला सर्वाधिक आनंद होईल असेही ते उपरोधिकपणे म्हणाले.

ज्या मराठा आरक्षणाच्या विरोधात जो व्यक्ती लढतो तो ॲड. गुणरत्न सदावर्ते हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात एकदम कसा पुढे आला. त्याला ५० लाख रूपये कर्मचाऱ्यांची केस लढविण्यासाठी दिल्याचे ऐकिवात आहे. मग त्याला निधी देणारे कोण, त्याच्या मागे कोण आहे याचाही तपास कऱण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

तुमच्याच कार्यकाळात नाना पटोले तेव्हा भाजपात होते. त्यांचा फोन अमझद खान यां नावाने फोन टॅप करण्यास सुरुवात झाली. बच्च कडू यांचा फोन बच्चू कडू यांचे नाव निझामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे तुमचे खासदार नाव परवेझ सुतार, आशिष देशमुख यांचे रघु चोरगे नाव मीना महेश साळुंखे असे दुसरे नाव ठेवले काय तर म्हणे पुण्यात ड्रग्जचा मोठा व्यापार सुरु असून हे लोक काँलेजच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवित असल्याचा आरोप करण्यात आला. हे सर्वजण तुमच्याच पक्षात होते. तरीही तुम्ही त्यांचे फोन टॅप करण्यास सुरुवात केलात याची आठवणही त्यांनी यावेळी फडणवीसांना करून देत ही पुणे येथे घडलेला गुन्हा. त्यानंतर मुंबईत दुसरा गुन्हा घडला. त्याबाबत अधिक काही बोलणार नाही. कारण सध्या ही केस न्यायालयात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात केंद्रीय यंत्रणाचा वापर करणार असू तर मग… आपला एक प्रवक्ता जाहीर करतो त्याला आज अटक होणार, याच्यावर रेड पडणार आणि एक दोन दिवसात तसे घडते. त्यामुळे एखादी हॉटलाईन बसवलीय की काय, असा उपरोधिक सवाल करत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत तुम्हाला चार राज्ये मिळालेली असली तर युपीत ५७ जागा कमी आलेल्या आहेत हे विसरू नका असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी भाजपा सदस्यानी राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नसल्याचे टोला वळसे-पाटील यांना लगावला.

Check Also

संजय राऊत यांना समन्स, हाजीर हो

पत्राचाळ प्रकरणी नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अलीकडेच जामीन मिळाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *