राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नारगेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून हा सरकारी बळी आहे असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
कैलास नागरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कैलाश नागरे यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्याच्यांशी आपला अनेक वर्षांपासून स्नेह होता. नागरे हे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक जाणिव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले होते मी माझ्या मुलाला तुझी शेती पहायला पाठवतो असे त्यांना सांगितले होते. माझ्या मुलाला आदर्श म्हणून दाखवलेला माणूस अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो हे अत्यंत वेदनादायी असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल. कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतक-यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचेही यावेळी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, एक ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला पाणीसुद्धा उपलब्ध करुन देता येत नाही हे अत्यंत लाजीरवाणे व वेदनादायी आहे. एक तरुण शेतकरी आपले आयुष्य संपवतो याहून दुसरे दुर्दैव काय, पण सत्तेत बसलेल्यांना फक्त हिंदू, मुस्लीम, औरंगजेब याच्यापलीकडे काही दिसतच नाही. हे सरकार मुर्दाड आहे, मुजोर आहे क्रूरकर्मा औरंजेबापेक्षा निष्ठूर आहे, या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच असल्याची टीकाही यावेळी केली.
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कैलास नारगे या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने सरकारने खडबडून जागे व्हायला हवे पण तसे होताना दिसत नाही. कैलास नागरेची आत्महत्या ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शमरेने मान खाली घालायला लावणारी आहे. सरकारमध्ये थोडीफार लाज शरम शिल्लक असेल तर त्यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करून नागरे यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी व महाराष्ट्रात पुन्हा कोणी कैलास नागरे आत्महत्या करणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही यावेळी केले.