पानिपतच्या “काला अंब” परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
मंत्री ॲड. शेलार म्हणले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला ३५४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत आश्वासन दिले होते. मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध भागात आपले साम्राज्य निर्माण केले होते. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी स्थळे अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
“काला अंब” स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता येणार नसल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
या प्रकल्पाकरिता हरियाणा राज्य सरकारशी समन्वय साधण्यासाठी राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल हे समन्वयक तर जमीन अधिग्रहनाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केले जाणार असून पर्यटन विभाग ‘नोडल’ म्हणून काम करणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचा योग्य तो परिणाम साधण्यासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येतील. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञांची समितीही गठित करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीमुळे मराठा शौर्याचा वारसा जतन होईल आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या महान इतिहासाची माहिती मिळेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.
शासन निर्णय जारी
पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल, अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हरियाणा राज्यातील पानिपत येथील ‘कालाअंब‘ परिसरात लवकरच ‘मराठा शौर्य स्मारक‘ उभारले जाईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
या यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, हरियाणा राज्यातील ‘कालाअंब‘ येथे लवकरच या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा यांचा भव्य पुतळा उभा केला जाईल. तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम व आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी मी स्वत: समन्वयक म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्यात येतील.