Breaking News

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळेल नागरिकांना तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.
चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे, केंद्र शासनाकडूनही आवश्यक ती मदत दिली जाईल, संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार आशिष शेलार, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आदी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत राज्यपाल कोश्यारी यांनी प्रशासनाकडून आतापर्यंतच्या झालेल्या बचाव व मदत कार्य याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पूरपरिस्थिती व प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती राज्यपालांना दिली. त्याचप्रमाणे सध्या देण्यात असलेल्या मदतीबाबतचीही माहिती दिली. हे मदत कार्य असेच सुरू राहावे आणि प्रत्येक पूरग्रस्त नागरिकास शासकीय मदत वेळेवर पोहोचवावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्यपालांनी केली महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी
महाड तालुक्यातील तळीये गावातील झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामुळे आम्ही सर्व दुःखी आहोत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे, अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाड मधील तळीये गावी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
राज्यपाल कोश्यारी आज महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी करण्याकरिता आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते सर्व व्यवस्थित करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा एकत्रित प्रयत्न केंद्र सरकार व राज्य शासन करील. या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी दरडग्रस्त तळीये गावाच्या स्थळी पुष्पचक्र अर्पण करुन मृतात्म्यांना कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाडचे तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर,तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

Check Also

सूरतमधील भाजपा उमेदवार मुकेश दलाल मतदाना आधीच बिनविरोध

सूरत मधील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचे मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *