Breaking News

प्रियांका गांधी यांचा १० तारखेला गोवा दौरा खाणकाम उद्योगाला चालना देणार

मराठी ई-बातम्या टीम
गोव्यातील खाण उद्योगाच्या अनुषंगाने अनेक वाद-विवाद सुरु असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या १० डिसेंबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. मात्र या दौऱ्यात त्या खाण उद्योगाला चालना देण्यासाठी त्या येणार आहेत. विशेष म्हणजे प्रियंका गांधी या पहिल्यांदाच गोव्याला येणार आहेत.
गोव्यातील भाजपा सरकार या मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरले असून काँग्रेसच लोकांना रोजगार मिळवून देईल असा दावा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला असून प्रियंका या आपल्या भेटीत इंदिरा गांधी यांनी १९७२ मध्ये उद्घाटन केलेल्या इमारतीलाही भेट देणार आहेत.
खान उद्योग पुन्हा सुरू करावा यासाठी नुकताच गोव्यातील एकवीस सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या. खाणकाम सुरू करण्यासाठी काँग्रेसने आता उघडपणे पाठिंबा दिला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आठ खाणींचा लवकरच लिलाव करणार असल्याची माहिती दिली. मात्र आधीपासून सुरू असलेल्या खाणी तातडीने सुरू कराव्यात जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल अशी काँग्रेसची मागणी आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून प्रियंका गांधी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि गोवा काँग्रेसचे अध्यक्ष दिगंबर कामत यांनी माहिती दिली.
भाजपाकडून अन्याय झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना प्रियंका गांधी भेटणार आहेत.खाणकाम क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील भाजप सरकारने याबाबतचे विधेयक संसदेत आणल्यास काँग्रेस त्याला पूर्ण पाठिंबा देईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षांपासून गोव्यातील खान कामावर पूर्णपणे बंदी आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनानंतर खान क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र या बंदीमुळे सुमारे चार लाख लोकांचा रोजगार गेला. यासंदर्भात गोव्यातील एकवीस सरपंचांनी नुकतेच पंतप्रधानांना एक पत्र पाठवून खाणकाम पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. २०१३ मध्ये गोव्याने पंतप्रधानांना भाजपचे उमेदवार म्हणून नामांकन दिलं होतं किमान पंतप्रधानांनी रिटर्न गिफ्ट म्हणून तरी गोव्यातील खाण उद्योग सुरू करावा असंही सरपंचांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
गोव्यातील खाणकाम हा एक मोठा आणि ज्वलंत प्रश्न असल्याने प्रत्येक पक्ष आता हा प्रचाराचा मुद्दा करत आहे. आपण सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यात खाणकाम पुन्हा सुरू करू असा दावा आम आदमी पक्षानेही नुकताच केला आहे. तर राज्यातील विद्यमान भाजप सरकारने सहा ते आठ खाणींचा लिलाव करून पुन्हा कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले आहे. खाण उद्योग आवरून गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपा यांच्यात संघर्ष सुरू आहे. २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पस्तीस हजार कोटी रुपये लुटल्याचा आरोप काँग्रेसवर केला होता. नंतर मात्र त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही रक्कम तीनशे कोटी पेक्षा जास्त नसल्याचं स्वतः मान्य केलं होतं. त्यामुळे प्रियंका गांधी यांचा गोवा दौरा आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *