एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास्थानावर केलेल्या आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता सदावर्तेंचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.
सदावर्तेंना अटक करून किल्ला न्यायालयात हजर कऱण्यात आले असता त्यावेळीही त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र त्यावेळी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा दोन दिवसानंतर सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यावेळीही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकीलांनी त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने सदावर्ते यांना पोलिस कोठडी देण्याऐवजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर,इतर आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
याचबरोबर आरोपी सदावर्तेचा ताबा सातारा पोलिसांनी मागितला आहे, त्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीने आज वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. न्यायाधीस नदीम मेमन यांच्या समोर ही सुनावणी पार पडली, ज्यांनी मागील वेळी सदावर्तेंना पोलीस कोठडी सुनावली होती. सरकारी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न केला गेला की पुढील चौकशीसाठी आणि नव्याने अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीसाठी सदावर्तेंची पोलीस कोठडी आणखी काही दिवस वाढवून दिली जावी. मात्र न्यायालायने पोलीस कोठडीस नकार दर्शवत सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी सुनावली.
